पुण्यातील चार आमदारांना संसदीय कामगिरीचे पुरस्कार; गाडगीळ, शिरोळे, तुपे, मोहिते मानकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 01:12 PM2024-09-04T13:12:08+5:302024-09-04T13:13:34+5:30
लोकप्रतिनिधी म्हणून झालेला हा गौरव राजकीय कारकिर्दीतील आनंदाचा क्षण म्हणून कायम स्मरणात राहील, मतदारांच्या वतीने हा पुरस्कार आम्ही स्वीकारत आहोत
पुणे: जिल्ह्यातील अनंत गाडगीळ, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे व दिलीप मोहिते हे चार आमदार राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने उल्लेखनीय विधिमंडळ कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे मानकरी ठरले. मुंबईत मंगळवारी सायंकाळी विधिमंडळात झालेल्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आले.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यावेळी उपस्थित होते. लोकप्रतिनिधी म्हणून झालेला हा गौरव राजकीय कारकिर्दीतील आनंदाचा क्षण म्हणून कायम स्मरणात राहील. मतदारांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारत आहोत, अशा आशयाची भावना पुरस्कार विजेत्या आमदारांनी व्यक्त केली.
अनंतराव गाडगीळ २०१४ ते २०२० या कालावधीत विधान परिषदेचे आमदार होते. त्यांनी जनउपयोगी प्रश्न सभागृहात उपस्थित करून वेळप्रसंगी सरकारला कायदे करण्यास भाग पाडले. सभागृहात मांडलेल्या त्यांच्या बहुतांशी लक्षवेधी सूचना गाजल्या व निर्णायक झाल्या. कोरोनाकाळात आमदार निधीतून त्यांनी अनेक रुग्णालयांना २ कोटी रुपयांची वैद्यकीय सामग्री दिली. याचा विचार समितीने पुरस्कारासाठी केला.
चेतन तुपे हडपसर विधानसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये निवडून आले. विधिमंडळाच्या कामकाजातील नियमित सहभाग, विधिमंडळाच्या नियम, संकेत, कायदे याचे काटेकोर पालन, संसदीय परंपरांचे, शिष्टाचारांचे भान, उपस्थित करावयाच्या विषयाचे आकलन, विधिमंडळात विषय मांडताना वापरलेले कौशल्य, निवडलेले मुद्दे आणि विषय मांडण्याची पद्धत या सर्वांचा विचार करून त्यांची पुरस्कारासाठी निवड झाली.
सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील विविध प्रश्न मांडत असतानाच राज्यातीलही अनेक विषय सभागृहात प्रभावीपणे मांडले. समस्या मांडत असतानाच त्या सोडवण्यासाठीच्या सूचनाही ते सभागृहात करत असत. विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी, खडकी कॅन्टोनमेंटचा महापालिका हद्दीत समावेश, नदीतील जलपर्णी, मराठा आरक्षण, मतदार संघातील पूरग्रस्त वसाहती यांसोबतच इतर अनेक सभागृहात प्रभावी मांडणी केली. याचा विचार करून त्यांची सर्वोत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी निवड झाली.
खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते-पाटील २०१९ च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यांनी खेड तालुक्यातील अनेक प्रश्नांचा विधिमंडळात सातत्याने पाठपुरावा केला. संसदीय नियमांचे पालन करून सातत्याने आपली विधिमंडळातील कामगिरी त्यांनी उंचावत नेली. ग्रामीण भागातील अनेक विषय त्यांनी पटलावर आणले व सरकारला त्यात निर्णय घेणे भाग पाडले.