देशातील महत्त्वाच्या घोटाळ्यांत संसदीय समित्यांचे झाले ' भजे ' : माधव गोडबोले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 12:04 PM2019-02-11T12:04:52+5:302019-02-11T12:17:50+5:30
गेल्या ७० वर्षात निवडून दिलेले लोकविधायक हे त्याचे फलित म्हणावे का, आजवर ज्या प्रकरणाकरिता संसदीय समिती नेमण्यात आल्या त्या एकाही प्रकरणात यशस्वी झाल्या नाहीत.
पुणे : देशभरातील बोफोर्स, हर्षद मेहता बँक घोटाळा आणि टू जी स्पेक्ट्रम घोटाळा मोठमोठ्या घोटाळ्यांकरिता ज्या मोठ्या समिता नेमण्यात आल्या त्याचे पुढे काय झाले? असा प्रश्न कुणी विचारत नाही. संसदीय समिती नेमायची, त्यानंतर चौकशी अहवाल, मात्र त्यातून फार काही साध्य होत नाही. राफेल प्रकरणी चर्चा केली जाते याचा अर्थ आपण निवडून दिलेल्या सरकारवर आपला विश्वास नाही का, तसेच गेल्या ७० वर्षात निवडून दिलेले लोकविधायक हे त्याचे फलित म्हणावे का, आजवर ज्या प्रकरणाकरिता संसदीय समिती नेमण्यात आल्या त्या एकाही प्रकरणात यशस्वी झाल्या नाहीत. अशाप्रकारे संसदीय समित्यांचे भजे झाले आहे. अशी सणसणीत टीका संसद प्रक्रियेवर माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी केली.
राष्ट्रीय प्रतिष्ठानच्यावतीने टिळक स्मारक मंदिरात राष्ट्रीय चारित्र्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माधव गोडबोले यांनी भुषविले. याप्रसंगी परमवीर चक्रविजेते संजयकुमार यांना राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबरोबरच पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर क्षेत्रातील निवडक विद्यार्थ्यांना शहर पातळीवरील चारित्र्य उपासक छात्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र व पंजाबचे माजी पोलीस महासंचालक एस. एस. विर्क, सरहदच्या विश्वस्त सुषमा नहार, अंकिता शहा, सुभाष मोहीते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गोडबोले म्हणाले, बोफोर्सचा घोटाळा, हर्षद मेहता यांचा बँक घोटाळा आणि टू जी स्पेक्ट्रमचा घोटाळा ही देशातील काही प्रमुख घोटाळ्यांची उदाहरणे यात देखील चौकशीकरिता संसदीय समिती नेमण्यात आली. मात्र कालांतराने तपास रेंगाळत गेल्याने त्या समितीकडून म्हणावा तितकासा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. देशातील नागरिकांना याप्रकारच्या समित्यांकडून मोठ्या प्रमाणावर अपेक्षा असताना संसदीय समित्यांचे अपयश खेदजनक म्हणावे लागेल. त्यामुळेच संसदीय समितीचे भजे झाले आहे. असे म्हणावे लागते. ज्यांना देशातील सर्वोच्च अशा पुरस्काराने गौरविण्यात आले अशा माजी राष्ट्रपतींनी देखील पंतप्रधान संसदेला जबाबदार असतात. संसदीय समितीला नव्हे. त्यामुळे त्यांनी अशा समितीला सामोरे जाण्याची गरज नाही. यातून संसदीय समितीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
* देशातील तरुणांना प्रेरित करायचे असेल तर त्यांना आपल्या सैनिकांच्या युध्दाचा गौरवशाली इतिहास समजून सांगावा लागेल. त्याची गरज आहे. राष्ट्रउभारणीकरिता त्याची आवश्यकता आहे. प्रत्येक पिढीला हे सांगावे लागेल जेणेकरुन त्यांच्यात देशभक्ती जागृत होण्यास मदत होईल. देशाविषयी प्रेम व आदराची भावना निर्माण होण्याकरिता इतिहासाचे स्मरण हवेच. असे मत विर्क यांनी व्यक्त केले.