दुसऱ्या पत्नीला पोटगी देणे पडले भाग, फसवून केले होते लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 03:14 AM2017-08-11T03:14:45+5:302017-08-11T03:14:45+5:30
दुसरा विवाह कायदेशीर नसल्याचे सांगत पोटगी देण्याच्या जबाबदारीपासून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला. या महिलेने तब्बल ७ वर्षे न्यायालयीन संघर्ष करून पोटगीचा अधिकार मिळविला.
पुणे : हिंदू विवाह पद्धतीनुसार पुरुषाचा दुसरा विवाह ग्राह्य धरून न्यायालयाने एका महिलेस पोटगी देण्याचा आदेश दिला आहे. पहिला विवाह झाल्याचे लपवून, या पतीने दुसरा विवाह केला होता. त्यानंतर दुसरा विवाह कायदेशीर नसल्याचे सांगत पोटगी देण्याच्या जबाबदारीपासून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला. या महिलेने तब्बल ७ वर्षे न्यायालयीन संघर्ष करून पोटगीचा अधिकार मिळविला.
दावा दाखल केल्यापासून ( १५ डिसेंबर २०१२) दरमहा ५ हजार रुपये पोटगी आणि नुकसानभरपाईपोटी २० हजार रुपये देण्याचा आदेश दिला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय. पी. पुजारी यांनी हा आदेश दिला. पती, पहिली पत्नी आणि तिच्या दोन्ही भावांनी संबंधित महिलेला त्रास देऊ नये, असेही आदेशात नमूद केले आहे. कल्पना (नाव बदलले आहे) यांनी अॅड. प्रवीणकुमार सुतार यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला होता. पतीचे निधन झाल्यानंतर, तीन मुलांसह त्या माहेरी पुण्यात माहेरी आल्या होत्या. सासरहून त्यांना १५ लाख रुपये मिळाले होते. एके दिवशी अतुल (नाव बदलले आहे) याची दुचाकी कल्पना यांच्या पायाला धडकली. उपचार करण्याची तयारी दाखवून पोलीस तक्रार करू नये, अशी मागणी अतुल याने केली. या निमित्ताने ओळख वाढविली. एकेदिवशी कल्पनावर अत्याचार केला. ती आरडाओरडा करू लागली. त्यावेळी फिल्मी स्टाइलने अतुल याने तिच्या कपाळात कुंकू भरले. लग्न करतो, असे सांगून कल्पना हिला शांत केले. आळंदी येथे हिंदू पद्धतीने विवाह केला. दोघे दीड वर्षे एकत्र राहिले. त्यानंतर अतुल याने तो काम करत असलेल्या कार्यालयातील धनादेश चोरला. तो कल्पनाच्या बँक खात्यावर भरून पैसे काढले. या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली. त्यावेळी अतुल याला त्याची पहिली पत्नी भेटायला आली. पतीचे खरे रूप उघड झाल्यानंतर, ती त्याच्यापासून वेगळी राहू लागली होती. तरीही अतुल घरी जाऊन त्रास देत असे. पहिल्या पतीकडून मिळालेले १५ लाख रुपये काढून घेतले. त्यामुळे कल्पना आर्थिकदृष्ट्या रस्त्यावर आली. या त्रासाला कंटाळून अखेर तिने पोटगीसाठी धाव घेतली.
‘तो’ म्हणे गुंगीचे औषध देऊन लग्न केले
या प्रकरणात अतुल याने गुंगीचे औषध देऊन कल्पना हिने बळजबरीने विवाह केल्याचा बचाव केला. तसेच, माझा पहिला विवाह झाला असल्याने दुसरा विवाह आपोआपच रद्द ठरतो. त्यामुळे दुसºया पत्नीला म्हणजे कल्पना हिला पोटगी मागण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद केला; मात्र कल्पना हिचे वकील प्रवीणकुमार सुतार यांनी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्याय निवाड्यांचा दाखला दिला. त्यानुसार न्यायालयाने पोटगी मंजूर केली.