पार्थ, सार्थक मस्तीखोर तर आकाश शांत; पुण्यातील बछड्यांची भन्नाट 'दुनियादारी'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 12:39 PM2020-10-23T12:39:27+5:302020-10-23T12:44:53+5:30
रिद्धी वाघिणीच्या बछड्यांचा आज दुसरा वाढदिवस
श्रीकिशन काळे
पुणे : राजीव गांधी प्राणी संग्रहालयात दोन वर्षांपूर्वी रिद्धी वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला. त्यांचा आज (दि. २३) दुसरा वाढदिवस आहे. चौघांपैकी पार्थ सर्वाधिक मस्ती करतो, तर सार्थक सोबत खेळायला त्या आवडते. आकाश मात्र खूप शांत असल्याने दोघांपासून जरा दूरच राहतो. पौर्णिमा या बहिणीसोबत तिघांचे भांडण होत असल्याने तिला वेगळे ठेवले आहे.
सध्या प्राणिसंग्रहालयात सात वाघ आहेत. त्यापैकी हे चौघे सर्वात तरूण आहेत. दोन वर्षापूर्वी यांचा जन्म झाल्यानंतर पुणेकरांनी आनंदोत्सव साजरा केला होता. तत्कालीन महापौर मुक्त टिळक यांनी या चौघांचा नामकरण सोहळा थाटामाटात केला होता. आता हे बछडे चांगलेच 'हेल्दी' आणि मोठे झाले आहेत. पुणेकर त्यांना पाहण्यासाठी उत्सुक आहेत, पण कोरोनामुळे प्राणिसंग्रहालय बंद ठेवण्यात आले आहे.
या वाघांची काळजी घेणारे दत्ता चांदणे म्हणाले, मी पेशवे पार्क मध्ये होते, तेव्हापासून वाघाची काळजी घेण्याचे काम करतोय. नंतर वाघांना कात्रजच्या प्राणिसंग्रहालयात आणले. इथे दोन वर्षांपुर्वी रिद्धी वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला. चौघेही आता चांगलेच मोठे झाले आहेत. ते मोठे झाल्याने त्यांची आई आणि बहिण यांच्या सोबत भांडण करतात म्हणून त्यांना वेगळ्या खंदकात ठेवले आहे. पण तीन भावडं मात्र छान राहतात. त्यात पार्थ सार्थकसोबत मस्ती करत असतो, तर पौर्णिमाशी त्यांचे पटत नाही.''
सकाळी तिघांना खंदकात सोडले की, अगोदर अर्धा तास फिरतात मग पाण्यात थोडा वेळ आराम करतात. त्यानंतर मात्र पार्थ-सार्थक खूप खेळतात. आकाश निवांत एका जागेवर बसून दोघांकडे पाहत असतो. मी आवाज दिला की लगेच ते सतर्क होतात. माझी सांगितलेली गोष्ट ते ऐकतात. रोज प्रत्येकजण चार ते पाच किलो मांस खातो.
- दत्ता चांदणे, केअर टेकर
कोरोनामुळे प्राणिसंग्रहालय बंद ठेवले आहे. वाघांचे फोटो काढण्यासाठी संचालक डाँ. राजकुमार जाधव यांची परवानगी घेण्यात आली होती. कारण प्राणिसंग्रहालय बंद आहे, पण पुणेकरांना वाघ घरबसल्या पाहता यावेत म्हणून फोटो काढण्यासाठी जाधव यांनी सहकार्य केले.