पिंपरी महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी चालला पार्थ पवारांचा 'शब्द'; राजू मिसाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 01:04 PM2020-09-08T13:04:09+5:302020-09-08T13:22:03+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसला महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचे संळ्याबळ मिळाले होते.
पिंपरी: पिंपरी- चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भोसरीचे नगरसेवक अजित गव्हाणे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, भोसरीत प्रतिस्पर्ध्याला ताकद मिळू नये म्हणून भाजप आमदार महेश लांडगे यांची मैत्री राजू मिसाळ यांच्या पथ्यावर पडली आहे.आणखी यात भर आणि आश्चर्याचा धक्का म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनीही राजू मिसाळ यांच्या नावाची शिफारस केल्याने विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादीतर्फे मिसाळ यांनी सोमवारी अर्ज दाखल केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचे संळ्याबळ मिळाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीला विरोधीपक्षनेतेपद मिळाले. दरवर्षी नगरसेवकांना या पदाची संधी देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार तीन वर्षात योगेश बहल, दत्ता साने व नाना काटे यांना संधी मिळाली. काटे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी मागील आठवड्यात राजीनामा दिला होता. त्यानंतर या वेळेस अजित गव्हाणे, राजू मिसाळ, वैशाली घोडेकर ही नावे चर्चेत होती. त्यामध्ये भोसरीत राष्ट्रवादीची कमी झालेली ताकद वाढवण्यासाठी व आमदार महेश लांडगे यांना शह देण्यासाठी गव्हाणे यांना संधी मिळण्याची जोरदार शक्यता होती. मात्र पडद्यामागील काही राजकीय घडामोडींनी राजू मिसाळ यांचे नाव उचलून धरण्यात आले. तसेच त्यांचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्याशी असलेली मैत्री व पार्थ पवार यांनी शिफारस केल्याने विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत कामी आली असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे