शिरूर-चौफुला महामार्गाचे अर्धवट काम; रात्री मातीचा ढिगारा न दिसल्याने दुचाकीवरून पडून युवकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 05:40 PM2024-08-23T17:40:58+5:302024-08-23T17:41:27+5:30
रस्त्यावर काम चाललेल्या मातीच्या ढिगार्यावर कुठलाही रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या वेळी दुचाकीवरून घसरून पडल्याने तरुणाच्या डोक्याला जबरदस्त इजा झाली
केडगाव: नितीन गोपालभाई पटेल (वय ३७) चौफुला येथे प्रगती ट्रेडर नावाने या युवकाचा व्यवसाय होता. कामानिमित्त दि. २२ रोजी सायंकाळी ८.३० वाजता घरी परतत असताना रस्त्यावर काम चाललेल्या मातीच्या ढिगार्यावर कुठलाही रिफ्लेक्टर नव्हता. रात्रीच्या वेळी न दिसल्यामुळे दुचाकीवरून घसरून पडल्याने डोक्याला जबरदस्त इजा झाली. त्यातच उपचारापूर्वी युवकाचा मृत्यू झाल्याचे खाजगी रुग्णालयात जाहीर करण्यात आले. या युवकाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी आई-वडिलांच्या व युवकाच्या पश्चात दोन लहान मुले व पत्नी यांनी हंबरडा फोडल्याने परिसरातील नागरिकांचे मन हेलावले.
राष्ट्रीय महामार्ग प्रशासन यास जबाबदार असून त्यांनी सदर कुटुंबातील कर्ता पुरुष मृत पावल्याने कुटुंबास मदत करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली. शिरूर- चौफुला या दरम्यान महामार्गाचे काम राष्ट्रीय महामार्गाकडून चालू आहे. हे काम पूर्ण होण्याची मुदत ऑगस्ट २०२४ अशी आहे. मात्र अद्याप रस्त्याचे काम बऱ्यापैकी अर्धवटच दिसून येत आहे. या कामांमध्ये ठेकेदाराने वेगवेगळ्या ठिकाणी उकरलेल्या रस्त्याच्या ठिकाणी योग्य दिशादर्शक, रिफ्लेक्टर व फलक बसवलेले नाहीत. त्यामुळे वेळोवेळी अपघात होत असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागास नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. मात्र अधिकाऱ्यांकडून कंत्राटदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली दिसून येत नाही. या महामार्गावर १० मोठे खाजगी दवाखाने तर ५ मोठ्या खाजगी शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थी व रुग्णांची प्रचंड हेळसांड होते. ते काम वेगाने होणे अपेक्षित आहे. मात्र काही ठिकाणी रस्त्याला विरोध होत असल्यामुळे काम वेळेत पूर्ण करता आले नाही अशीही खंत राष्ट्रीय महामार्ग उप अभियंता प्रेरणा कोटकर यांनी व्यक्त केली. या रस्त्यावर वाहतूक कोंडी प्रचंड होत आहे. नागरिकांना खडतर प्रवास करत या रस्त्यावरून जावे लागत आहे. येथे घडलेल्या अपघातामुळे अनेक नागरिकांना कायमचे अपंगत्व आले आहे. तर काल घडलेल्या घटनेमध्ये युवकाला नाहक जीव गमवावा लागला.