महाराष्ट्रात ६७ वर्षांत ४६१ महिला आमदार, यंदा निवडणुकीच्या रिंगणात ३६३ महिला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 07:48 PM2024-11-16T19:48:40+5:302024-11-16T19:49:13+5:30

राज्यातील विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, एकूण ४,१३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Participation of 461 women MLAs in 67 years of Legislative Assembly | महाराष्ट्रात ६७ वर्षांत ४६१ महिला आमदार, यंदा निवडणुकीच्या रिंगणात ३६३ महिला

महाराष्ट्रात ६७ वर्षांत ४६१ महिला आमदार, यंदा निवडणुकीच्या रिंगणात ३६३ महिला

पुणे - महाराष्ट्र विधानसभेच्या ६७ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदारांनी सभागृहात प्रतिनिधित्व केले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ३६३ महिला उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. राज्यातील विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, एकूण ४,१३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

महिला मतदारांचा सहभाग वाढतोय

२०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात मतदारांचे लिंग गुणोत्तर १००० पुरुषांमागे ९२९ महिलांचे होते. मात्र, २०१९ साली मतदार यादीत हे प्रमाण ९२५ पर्यंत कमी झाले. यानंतर महिलांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमा राबवण्यात आल्या, ज्यामुळे २०२४ मध्ये हे प्रमाण ९३६ वर पोहोचले.

या निवडणुकीत राज्यातील महिला मतदारांची संख्या ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ आहे, तर पुरुष मतदारांची संख्या ५ कोटी २२ हजार ७३९ इतकी आहे. महिला मतदारांचा टक्का जवळपास ५०% आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते.

पहिल्या विधानसभेत सर्वाधिक महिला आमदार

महाराष्ट्राच्या पहिल्या विधानसभेत (१९५७-१९६२) सर्वाधिक ३० महिला आमदार होत्या. त्यानंतर १९७२-७८ या कार्यकाळातील चौथ्या विधानसभेत २८ महिला आमदार होत्या. २०१९-२४ च्या चौदाव्या विधानसभेत २७ महिला आमदारांचा सहभाग होता. मात्र, १९९०-९५ च्या आठव्या विधानसभेत केवळ ६ महिला आमदारच निवडून आल्या होत्या, जी संख्या सर्वात कमी आहे.

महिला आमदारांच्या संख्येचा आलेख

महिला आमदारांचे प्रमाण पहिल्या विधानसभेपासून सातत्याने चढ-उताराचे राहिले आहे. पहिल्या विधानसभेपासून आतापर्यंत सर्वाधिक महिला आमदार पहिल्याच कार्यकाळात निवडून आल्या, तर नंतरच्या काळात हे प्रमाण ३० च्या आतच राहिले आहे.

महिला प्रतिनिधित्वाचा आकडा कधी वाढणार?

यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांच्या संख्येने वाढ झाली असली, तरी विधानसभेत त्यांचे प्रतिनिधित्व किती प्रमाणात वाढेल हे २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

Web Title: Participation of 461 women MLAs in 67 years of Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.