वाणिज्यसाठी विद्यार्थ्यांची भागम्भाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 05:26 AM2017-07-20T05:26:04+5:302017-07-20T05:26:04+5:30
इयत्ता अकरावीमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी सध्या जोरदार रस्सीखेच असली तरी पदवी स्तरावर मात्र चित्र उलटे आहे. पदवी अभ्यासक्रमामध्ये विज्ञानपेक्षा
- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : इयत्ता अकरावीमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी सध्या जोरदार रस्सीखेच असली तरी पदवी स्तरावर मात्र चित्र उलटे आहे. पदवी अभ्यासक्रमामध्ये विज्ञानपेक्षा वाणिज्य शाखेला अधिक पसंती मिळत आहे; मात्र मागणीच्या तुलनेत उपलब्ध प्रवेशक्षमता कमी असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी भागम्भाग करावी लागत असल्याचे चित्र आहे. विद्यापीठाकडून वाढीव कोटा दिला जात असला, तरी तो पुरेसा नसून अद्यापही अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विविध महाविद्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागत आहेत.
इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर, प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची प्रक्रिया सुरू होते. बहुतेक महाविद्यालयांकडून आॅनलाइन पद्धतीने स्वतंत्रपणे ही प्रक्रिया राबविली जाते. दर वर्षी वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागत असून, यंदाही हे चित्र कायम आहे. किंबहुना यंदा विद्यार्थ्यांना अधिक धावाधाव करावी लागत आहे. चांगले गुण मिळविलेले विद्यार्थी मागील वर्षीचे ‘कटआॅफ’ पाहून मोठ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज करतात. अनेक जणांचे तीन-चार महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न सुरू असतात; पण ‘कटआॅफ’ वाढल्यास संबंधित महाविद्यालयांमध्येही प्रवेश मिळत नाही, तर कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना या महाविद्यालयांचे दरवाजे आधीच बंद झालेले असतात. हे चित्र यंदाही कायम असून, प्रक्रिया सुरू होऊन दीड महिन्यानंतरही विद्यार्थ्यांना शोधाशोध करावी लागत आहे.
इयत्ता बारावीचा वाणिज्य शाखेचा पुणे जिल्ह्याचा निकाल यंदा ९२.०२ टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये जवळपास तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे; तसेच महाराष्ट्र व राज्याबाहेरील विद्यार्थीही शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी येत आहेत. यामध्ये प्रत्येक वर्षी वाढ होत आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना वरिष्ठ महाविद्यालय जोडलेले असल्यास तेथील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रथम प्राधान्य दिले जाते.
बीएमसीसी, स. प. महाविद्यालय, गरवारे, वाडिया, मराठवाडा मित्रमंडळ, मॉडर्न यांसह बहुतेक मोठ्या महाविद्यालयांमध्ये येथील विद्यार्थ्यांमुळेच प्रवेश पूर्ण होतात. त्यामुळे बाहेरील विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही इतर महाविद्यालयांचा विचार करावा लागत आहे. तिथेही प्रवेशासाठी मागणी असल्याने अनेक महाविद्यालये फुल्ल झाली आहेत. विद्यार्थ्यांची मागणी पाहून अनेक महाविद्यालयांनी विद्यापीठाकडून दहा टक्के वाढीव कोटा घेतला असला, तरी तो अपुरा पडत आहे.
संख्या वाढली : जीएसटीमुळे करिअरला संधी
उच्च शिक्षणासाठी शहरामध्ये राज्यातील इतर भागांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर वर्षी वाढत आहे. बारावीचा निकालही सातत्याने वाढत आहे. उच्च शिक्षणाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत आहे. विज्ञान शाखेतून बारावी केलेले अनेक विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळतात; मात्र वाणिज्य शाखेचे अनेक विद्यार्थी पदवीला प्रवेश घेतात.
शहरामध्ये सीए, सीएस; तसेच वाणिज्यशी संंबंधित इतर परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाल्याने संधीही वाढल्या आहेत. या कारणांमुळे वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.
मोठ्या महाविद्यालयांमधील वाणिज्य शाखेच्या बहुतेक तुकड्यांचे प्रवेश फुल्ल झाले आहेत. त्यामुळे इतर महाविद्यालयांमध्येही विद्यार्थ्यांची मागणी वाढली आहे. परिणामी वाढीव कोट्यासाठी अनेक महाविद्यालयांकडून विद्यापीठाकडे प्रस्ताव येत आहेत. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील शंभरहून अधिक महाविद्यालयांचे असे प्रस्ताव आले असून, त्यातील बहुतेक महाविद्यालयांना दहा टक्के जागा वाढवून देण्यात आल्या आहेत. अजूनही ही प्रक्रिया सुरू असून प्रस्ताव येतच आहेत. यंदा या प्रस्तावांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
- डॉ. प्रफुल्ल पवार,
अधिष्ठाता, व्यवस्थापन वाणिज्य विद्याशाखा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
वाणिज्य शाखेला सर्वाधिक मागणी आहे. महाविद्यालयात बारावीचे ६०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर प्रथम वर्षाच्या जागा ४८० एवढ्या होत्या. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते. विद्यापीठाकडून दहा टक्के वाढीव जागा मिळाल्या असून, त्याही पूर्ण भरल्या आहेत. मोठ्या महाविद्यालयांचे कटआॅफ जास्त असते; तसेच विद्यार्थ्यांचा ओढाही या महाविद्यालयांकडे असतो. त्यामुळे ५०-६० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे अवघड होते. यंदाही ही स्थिती कायम आहे.
- डॉ. राजेंद्र झुंझारराव, प्राचार्य
मॉडर्न महाविद्यालय
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बहुतेक मोठ्या महाविद्यालयांचे कट वाढले आहेत. मला ७९.८ टक्के गुण असल्याने मराठवाडा मित्रमंडळमध्ये सहज प्रवेश मिळेल असे वाटले होते. पण कटआॅफ वाढल्याने निराशा झाली. मागील वर्षी कटआॅफ कमी होते. आता इतर महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करीत आहे.- ऋषभ संचेती, विद्यार्थी
महाविद्यालयात वाणिज्यच्या प्रत्येकी १२० प्रवेशक्षमतेच्या चार तुकड्या आहेत. त्यातील प्रवेश पूर्ण झाल्यानंतर, विद्यापीठाने १० टक्के वाढीव कोटा दिला. या जागाही भरल्या आहेत; मात्र अद्यापही अनेक विद्यार्थी प्रवेशासाठी विचारणा करीत आहेत. यामध्ये ८०-९० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
- डॉ. शोभा इंगवले, प्राचार्य शाहू विद्या मंदिर