त्यांच्याच बिल्डरांबरोबर भागीदाऱ्या
By admin | Published: February 18, 2017 03:39 AM2017-02-18T03:39:21+5:302017-02-18T03:39:21+5:30
भाजपातील तिकिटे बिल्डरने दिल्याचा आरोप अजित पवार, नारायण राणे व राज ठाकरे यांनी केला आहे. परंतु, वास्तवामध्ये बिल्डरांबरोबर
पुणे : भाजपातील तिकिटे बिल्डरने दिल्याचा आरोप अजित पवार, नारायण राणे व राज ठाकरे यांनी केला आहे. परंतु, वास्तवामध्ये बिल्डरांबरोबर यांच्याच अनेक ठिकाणी भागीदाऱ्या आहेत. हेच मोठे बिल्डर आहेत. मग त्यांच्या पक्षातील तिकिटे कोणी दिली, असे जनतेने समजायचे? असा थेट सवाल करीत खासदार संजय काकडे यांनी त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला शुक्रवारी जोरदार उत्तर देत विरोधकांवर थेट हल्ला केला.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी धनकवडी-आंबेगाव पठार प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार भीमराव तापकीर, गोपाळ चिंतल, उमेदवार अभिषेक तापकीर, मोहिनी देवकर, वर्षा तापकीर व गणेश भिंताडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काकडे म्हणाले, ‘‘मी १९८६ मध्ये व्यवसायात आलो. व्यवसायात यशस्वी झाल्यानंतर राजकारणात आलो. परंतु, टीका करणारे अजित पवार, नारायण राणे व राज ठाकरे हे राजकारणातून व्यावसायिक झाले, हे संपूर्ण जनतेला माहीत आहे. मात्र, त्यांच्याकडे विकासाबद्दल बोलण्यासाठी काहीही नाही. कारण, गेल्या २० ते २५ वर्षांत सत्तेत राहूनही काँग्रेस-राष्ट्रवादीने काहीच केले नाही. त्याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पावधीत विकास योजना कार्यान्वित केल्या आहेत. विकासाच्या मुद्द्यावरच पुण्यातील निवडणूक भाजपा जिंकणार आहे. सर्व तिकिटे ही निवडून येण्याच्या क्षमतेवरच दिली असल्याने भाजपाचा विजय निश्चित झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकली आहे.’’ दीर्घकालीन विकासासाठी पुण्यात भाजपाला एकहाती सत्ता देण्याचे आवाहन दानवे यांनी केले.