महापौर बंगल्यावर सत्ताधारी-विरोधकांची रंगली ‘पार्टी’; उजेडात विरोध अंधारात ‘गळ्यात गळे’  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 11:48 AM2020-09-25T11:48:43+5:302020-09-25T11:49:35+5:30

एकीकडे सत्ताधाऱ्यांवर ‘निशाणेबाजी’ करायची आणि दुसरीकडे मात्र गळ्यात गळे घालून एकमेकांना‘प्रेमाचे घास’ भरवायचे..

The ‘party’ of the ruling-opposition at the mayor’s bungalow | महापौर बंगल्यावर सत्ताधारी-विरोधकांची रंगली ‘पार्टी’; उजेडात विरोध अंधारात ‘गळ्यात गळे’  

महापौर बंगल्यावर सत्ताधारी-विरोधकांची रंगली ‘पार्टी’; उजेडात विरोध अंधारात ‘गळ्यात गळे’  

googlenewsNext
ठळक मुद्देसुग्रास जेवणाचा बेत, कारण मात्र गुलदस्त्यात

पुणे : महापालिकेतील सत्ताधारी भाजपा आणि विरोधी बाकांवरील राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना, मनसे कोरोना काळात एकमेकांवर राळ उडवित असतानाच दुसरीकडे मात्र, एकत्र पार्ट्या झोडल्या जात आहेत. कॉंग्रेसच्या एका बड्या पदाधिकाऱ्याने बुधवारी महापौर बंगल्यावर आयोजित केलेल्या या पार्टीला सर्व  ‘पार्ट्या’चे पदाधिकारी उपस्थित होते. या पार्टीमागील कारण गुलदस्त्यात आहे.

शहरातील कोरोनाचे संकट गडद होत आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचा ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसाठी संघर्ष सुरु आहे. पालिकेतील पदाधिकारी दिवसा एकमेकांवर आरोपांच्या आणि टीकेच्या फैरी झाडत असताना दुसरीकडे मात्र अंधारात मेजवानीचा बेत करीत आहेत. बुधवारी रात्री महापौर बंगल्यामध्ये झालेल्या सुग्रास जेवणाच्या पार्टीची चर्चा गुरुवारी पालिका वर्तुळात ‘चवी’ने केली जात होती. या पार्टीला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह उपमहापौर सरस्वंती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार, मनसेचे वसंत मोरे यांच्यासह काही नगरसेवकही उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.
एकीकडे सत्ताधाऱ्यांवर ‘निशाणेबाजी’ करायची आणि दुसरीकडे मात्र गळ्यात गळे घालून एकमेकांना  ‘प्रेमाचे घास’ भरवायचे यामागील गमक समजत नसल्याचे याच विरोधी पक्षांच्या अन्य नगरसेवक आणि नेत्यांचे म्हणणे आहे. कॉंग्रेसच्या एका पदाधिका-याने दिलेल्या या पार्टीमुळे पालिकेतील राजकीय वातावरणात मात्र  ‘खमंग’ चर्चा झडू लागल्या आहेत. स्थायी समितीने अभय योजना आणण्याचा प्रस्ताव आणल्यानंतर कॉंग्रेसकडून बुधवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन ही योजना धनदांडग्यांसाठी आणल्याचा आरोप करीत विरोध करण्यात आला. त्याच रात्री पार्टीचे आयोजन झाल्याने आणि त्याला सत्ताधारी भाजपाच्या महापौरांपासून अन्य पदाधिका-यांनी हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
    ====
 ‘आरपीआय’ पार्टीपासून ‘वंचित’च
सत्ताधारी-विरोधकांच्या या पार्टीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) गटनेत्यांना निमंत्रण नव्हते. यासंदर्भात गटनेत्या सुनिता वाडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला या पार्टीचा निरोप नसल्याचे स्पष्ट केले. 

Web Title: The ‘party’ of the ruling-opposition at the mayor’s bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.