मनपाला पीएमपीच्या वाटाण्याच्या अक्षता, ज्येष्ठांसाठीची दरवाढ, विद्यार्थ्यांनाीही पडतो भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:06 AM2017-09-23T00:06:56+5:302017-09-23T00:06:57+5:30
ज्येष्ठांसाठीच्या सवलतीच्या पासमध्ये केलेली दरवाढ मागे घेण्याच्या महापालिकेच्या मागणीला पीएमपीने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. ४५० रुपयांच्या ज्येष्ठ व्यक्तींच्या मासिक पासची किंमत एकदम ७५० रुपये करण्यात आली आहे.
पुणे : ज्येष्ठांसाठीच्या सवलतीच्या पासमध्ये केलेली दरवाढ मागे घेण्याच्या महापालिकेच्या मागणीला पीएमपीने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. ४५० रुपयांच्या ज्येष्ठ व्यक्तींच्या मासिक पासची किंमत एकदम ७५० रुपये करण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठीचा रूट पास (अंतरानुसार दिला जाणारा) बंद करून त्यांनाही आॅल रूटचा पास घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्याकडे केली होती. तरीही त्याची दखल घेण्यात आली नाही. १ सप्टेंबरपासून ही वाढ अमलातही आणली गेली. त्यानंतरही पुन्हा मोहोळ यांनी मुंढे यांना पत्र दिले, मात्र त्याची दखलच घेतली गेली नाही, असे दिसते आहे.
महापालिका पासमधील सवलतींसाठी म्हणून पीएमपीएलला दरवर्षी साधारण ५० कोटी रुपये अदा करीत असते. पीएमपी प्रवाशांकडून पासच्या निम्मे पैसे घेत असते व निम्मे पैसे महापालिका अदा करत असते. पासची एकूण रक्कम साधारण १ हजार ४०० रुपये होते.
ज्येष्ठांकडून दरमहा ४५० रुपये घेत होती. उर्वरित रक्कम त्यांना महापालिका देत होती. असे असतानाही पीएमपीने ज्येष्ठांसाठी एकदम ७५० रुपये केले आहेत. विद्यार्थ्यांचा पासही ४५० रुपयांमध्ये उपलब्ध होत होता.
महापालिकेने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मुंढे यांची सर्व पदाधिकाºयांनी भेटही घेतली. त्यानंतर मोहोळ यांनी पत्रही पाठवले, मात्र पीएमपी प्रशासनाने यात काहीच केलेले दिसत नाही.
दरवाढ कायम आहे. दरमहा सुमारे १५ ते २० हजार नागरिक व किमान ५० हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी पासच्या सवलतीचा लाभ घेत असतात. त्या सर्वांना हा जादा भार सहन करावा लागत आहे. पीएमपीे प्रवासी मंच यांनीही या दरवाढीला विरोध केला आहे. कायदेशीर पूर्तता न करता ही दरवाढ केली असल्याचा आरोप मंचाचे पदाधिकारी जुगल राठी यांनी केला आहे.