धुक्यामुळे खोळंबलेल्या विमानाला प्रवासी वैमानिकाचा सहारा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 01:11 AM2019-12-02T01:11:33+5:302019-12-02T01:11:52+5:30
पुणे विमानतळावरून शनिवारी सकाळी ७.३० वाजता इंडिगो कंपनीचे विमान दिल्लीकडे झेपावणार होते.
पुणे : दिल्लीमधील दाट धुक्यामुळे पुण्याहून दिल्लीला जाणारे विमान बराच काळ धावपट्टीवरच उड्डाणाच्या प्रतिक्षेत होते. वैमानिकाला दाट धुक्यामध्ये विमान उतरविण्याचे प्रशिक्षण नसल्याने दिल्लीतील धुके निवळण्याची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. परंतु प्रसंग ओळखून याच विमानातून प्रवास करणाऱ्या प्रशिक्षित वैमानिकाने कॉकपिटचा ताबा घेऊन उड्डाणाची परवानगी मागितली. ती मिळाल्यानंतर त्याने विमान सुरक्षितपणे दिल्लीत नेऊन उतरविले आणि प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.
पुणे विमानतळावरून शनिवारी सकाळी ७.३० वाजता इंडिगो कंपनीचे विमान दिल्लीकडे झेपावणार होते. दिल्लीतील दाट धुक्यांमध्ये हे विमान उतरविण्यासाठी आवश्यक प्रशिक्षणच (कॅट ३ बी) वैमानिकाला नव्हते. त्यामुळे धुके कमी होईपर्यंत विमानाचे उड्डाण होणार नाही, हे स्पष्ट झाले. या संबंधीची उद्घोषणा ऐकून प्रवाशांमधीलच एक जण पुढे सरसावला. त्याने विमान उड्डाणाची परवानगी मागितली.
प्रवाशांना हे नंतर कळले. आवश्यक परवानग्या घेऊन कंपनीनेही त्याच्याकडे कॉकपीटची जबाबदारी सोपविली. पण त्याचे ‘फ्लाईट ड्युटी टायमिंग लिमिटेशन’ पूर्ण होत नव्हते. त्यामुळे विमान काही वेळ थांबवून सव्वा नऊच्या सुमारास उड्डाण करण्यात आले.
हिवाळ्यामध्ये कमी दृश्यता असलेल्या विमानतळांची विभागणी केलेली असते. त्यानुसार दृश्यतेचे प्रमाण निश्चित करून विमान उतरविण्यासाठीचे आवश्यक प्रशिक्षण वैमानिकांना दिले जाते. दृश्यतेच्या प्रमाणानुसार कॅट १,२,३ असे गट केलेले असतात. त्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण असते. कोणतीही कंपनीही प्रवाशांच्या जीव धोक्यात घालून विमान उड्डाण करत नाही. - धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ
दिल्ली विमानतळावर शनिवारी सकाळी कमी दृश्यता होती. त्यामुळे येणाºया विमानांचे कॅप्टन ‘कॅट ३बी’ हे प्रशिक्षण पूर्ण केलेले असणे अपेक्षित होते. पण पुण्याहून निघणाºया विमानाच्या कॅप्टनकडे हे प्रशिक्षण नव्हते. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून इंडिगोच्या ‘कॅट ३बी’ प्रशिक्षण पूर्ण केलेल्या दुसºया कॅप्टनला ही संधी देण्यात आली. यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या. - इंडिगो एअरलाईन्स