सिंहगड एक्स्प्रेसमध्ये पुन्हा प्रवाशाला मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा
By नितीश गोवंडे | Published: April 26, 2023 05:54 PM2023-04-26T17:54:11+5:302023-04-26T17:54:25+5:30
जुने पासधारक रेल्वेमध्ये दादागिरी करून जागा अडवून ठेवतात आणि भांडणे करतात
पुणे : पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसमध्ये जागेवरून नेहमीच वाद होतात. कधी-कधी प्रवाशांमध्ये फ्री स्टाईल मारामारी झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. मुळात या रेल्वेमध्ये जुन्या पासधारकांची मुजोरी मोठ्या प्रमाणात सुरू असते. अशाच पास धारकांच्या सात जणांच्या टोळक्याने बसण्याच्या कारणावरून एका प्रवाशाला बेदम मारहाण केली. संदीप गोंदेगावे (३७, रा. वरळे, ता. मावळ) असे मारहाण झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी रेल्वेपोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, सात प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप हे सोमवारी सकाळी सिंहगड एक्स्प्रेसमध्ये लोणावळा येथील नागरिकांसाठी राखीव असलेल्या डब्यात चढले. तेथे एक जागा रिकामी दिसल्याने तेथे त्यांनी बसण्याचा प्रयत्न केला. पण, येथे बसलेल्या प्रवाशांनी त्यांच्या सहकाऱ्यासाठी जागा अडवून ठेवली होती. संदीप यांनी विनंती केली असता, यावेळी त्या सात प्रवाशांनी वाद घालत मारहाण केली. त्यात संदीप यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
दरम्यान, जुने पासधारक रेल्वेमध्ये दादागिरी करून जागा अडवून ठेवतात. तसेच ग्रुपमध्ये बसून पत्त्यांचा डाव मांडतात. यामुळे इतर प्रवाशांना त्रास होतो. नवीन पासधारकांना बसायला जागा देत नाहीत. रेल्वे प्रशासनाने तात्काळ कारवाई करून या जुन्या पास धारकांची मुजोरी मोडीत काढावी, अशी मागणी संदीप यांनी केली.
महिन्यातील पाचवी घटना..
पुणे-मुंबई मार्गावर दररोज सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्स्प्रेस धावतात. कामानिमित्त अप-डाऊन करणाऱ्यांसाठी या तिन्ही रेल्वे सोयीस्कर आहेत. या तिन्ही रेल्वेमध्ये पास धारकांसाठी आरक्षित डबे आहेत. पण, जुन्या पासधारकांकडून नवीन पासधारकांना धमकावणे आणि मारहाणीच्या घटना नेहमी घडत असतात. या महिन्यातील ही पाचवी घटना असून, रेल्वे प्रवास सुरक्षित आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.