एसटीच्या आरक्षणाकडे प्रवाशांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:11 AM2021-03-26T04:11:36+5:302021-03-26T04:11:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: एसटीने प्रवास करण्यासाठी तिकीट आरक्षित करण्याकडे बहुसंख्य प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. स्थानकात जाऊन थेट गाडीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: एसटीने प्रवास करण्यासाठी तिकीट आरक्षित करण्याकडे बहुसंख्य प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. स्थानकात जाऊन थेट गाडीत बसण्यालाच प्रवाशांकडून पसंती दिली जात असून, त्यामुळे आरक्षणातून मिळणारे पुणे विभागाचे उत्पन्न घटले आहे.
मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात एसटीचे फक्त तिकीट आरक्षणातून मिळणारे उत्पन्न ६० लाख रूपये होते. कोरोनाच्या फेब्रुवारीत (२०२१) ते अवघे १२ लाख रुपये आहे. एसटीचे आरक्षणही आता ऑनलाइन केले जाते. त्याशिवाय स्थानकांमध्ये व काही खासगी कार्यालयांकडेही एसटीने आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा प्रवाशांकडून लाभही मोठ्या प्रमाणावर घेतला जात होता. मात्र आता त्यात मोठी घट झाली असल्याचे दिसते.
यापूर्वी एसटीचा लांबचा प्रवास असेल तर, तिकिटे हमखास आरक्षित केली जात असत. आता मात्र प्रवासी थेट स्थानकातच येऊन गाडीत बसताना दिसतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संख्या कमी झाल्यानेही आरक्षण घटले आहे, असे एसटीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पूर्वी रोज अडीच ते तीन हजारांपेक्षा जास्त तिकिटे रोज आरक्षित होत असत. आता ही संख्या फक्त ७०० वर आली आहे. तेवढीच तिकिटे आरक्षित होताना दिसतात. स्थानकात आल्यावर गाडी मिळेल, याची खात्री असल्यानेच तिकिटे आरक्षित होत नसतील असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
पुण्यात रोज साधारण १५०० गाड्या येतात-जातात. त्यांना आरक्षण सुविधा उपलब्ध आहे. पूर्वी बाहेरून पुण्यात येऊन पुढे जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण होत असे. आता ते होत नाही, असे आरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
मुंबई, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद या शहरांची तिकीटं मात्र आजही आरक्षित केली जातात. त्यांना अनेकदा वेटिंगही असते. अन्य शहरांचे आरक्षण करण्याचे प्रमाण मात्र कमी झाले आहे.
कोरोनानंतर एसटी सुरू झाली त्या वेळी ५० टक्के प्रवासी क्षमता, स्टँन्डिंग नाही, असा नियम होता. आता सोलापूरला जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्या वगळता हा नियम नाही. तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी ५० टक्के प्रवासीच असतील, हा नियम कायम ठेवला आहे.
--------------
आरक्षण ही सुविधा कायम आहे. मात्र, कोरोनामुळे तिला मिळणारा प्रतिसाद कमी झाला आहे. प्रवासी संख्याच घटल्यामुळे असे झाले असावे, कोरोनाची भीती गेल्यावर यात पुन्हा वाढ होईल.
- ज्ञानेश्वर रणावरे, विभागीय वाहतूक अधिकारी, पुणे विभाग