अंगावरुन इंजिन आणि रेल्वेचे डबे गेल्यानंतरही प्रवासी सुखरुप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 06:51 PM2019-09-19T18:51:34+5:302019-09-19T18:56:27+5:30
चक्कर आल्याने रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या प्रवाशाच्या अंगावरुन रेल्वे गेल्यानंतरही प्रवाशाचे प्राण वाचले आहे. रेल्वे पाेलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे प्रवाशाला जीवनदान मिळाले.
पुणे : ''देव तारी त्याला काेण मारी'' या म्हणीचा प्रत्यय चिंचवड रेल्वे स्टेशन येथील प्रवाशांना बुधवारी आला. रेल्वे प्रवास करत असताना चक्कर येऊन रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या प्रवाशाच्या अंगावरुन रेल्वेचे इंजिन आणि डबे गेल्यानंतरही चमत्कारीकरित्या प्रवासी बचावला आहे. ट्रकच्या मधाेमध पडल्यामुळे प्रवाशाला काेणतीही इजा झाली नाही. रेल्वे पाेलिसांनी प्रसंगावधान दाखवून रेल्वे थांबवत ट्रकवर पडलेल्या प्रवाशाला बाहेर काढले.
मध्य प्रदेशमधील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील शहापूर येथील रहिवासी असलेले प्रकाश भागवत माळी हे कामाच्या शाेधात चिंचवड येथे आले हाेते. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पुणे - पनवेल पॅसेंजर चिंचवड रेल्वे स्थानकावर आली. या रेल्वेने प्रकाश माळी प्रवास करणार हाेते. चिंचवड रेल्वे स्थानकावर गाडी थांबवण्याच्या वेळी प्रकाश यांना चक्कर आली आणि ते रेल्वे ट्रॅकवर पडले. ते ट्रॅकच्या मधाेमध पडले. ट्रॅकच्या मध्ये पडलेल्या प्रकाश यांच्या अंगावरुन रेल्वे इंजिन आणि तीन डबे गेले. ही घटना रेल्वे पाेलीस हवालदार अनिल बागुल आणि पाेलीस काॅन्स्टेबल तुकाराम वाळेकर यांच्या निदर्शनास आली. त्यांनी प्रसंगावधान दाखवून तत्काळ रेल्वे थांबवली. आणि प्रकाश यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
प्रकाश यांनी काही खाल्ले नसल्याने त्यांना चक्कर आली. कामाच्या शाेधात आलेल्या प्रकाश यांना काम सुद्धा मिळाले नाही. पाेलिसांनी त्यांना चिंचवड पाेलीस चाैकीत नेऊन जेवण दिले. त्यांच्यावर उपचार करुन त्यांना नातेवाईकांसाेबत पाठवून दिले.