पीएमपी बसमधील वाढत्या चोऱ्यांमुळे प्रवाशांमध्ये वाढतेय धास्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 01:48 PM2020-01-07T13:48:02+5:302020-01-07T13:51:44+5:30
चोरींच्या घटनांनी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
पुणे : दिवसेंदिवस बसमधील वाढलेल्या चोरींच्या घटनांनी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एकीकडे पोलिसांनी बसस्थानकांवर सुरक्षा वाढवली असली तरी चोरीच्या घटनांमध्ये कुठलाही फरक पडलेला नाही. चोरांना पोलिसांचे भय नसून ते मोकाटपणे नागरिकांना लुबाडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पीएमपीमधील वाढलेल्या या चोरीच्या घटनांवर मार्ग काढत चोरांना तत्काळ अद्दल घडवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हडपसर भागातील रहिवासी सुनंदा राऊत (वय ६४) या हडपसर ते आळंदी मार्गावरील बसमधून दोन दिवसांपूर्वी प्रवास करत होत्या. बस प्रवासात चोरट्यांनी राऊत यांच्या हातातील सोन्याची बांगडी कटरने तोडली. चोरलेल्या बांगडीची किंमत ४५ हजार रुपये असल्याचे राऊत यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अशाच प्रकारची घटना शनिवारी (दि. ३) घडली. वारजे ते सेनापती बापट रस्ता या मार्गावरील बसमधून प्रवास करणाºया अंबुबाई धुमाळे (वय ७८, रा. खडकवासला) यांच्या हातातील ५५ हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबविली. सेनापती बापट रस्त्यावरील थांब्यावर उतरत असताना गर्दीत ही घटना घडली. धुमाळे यांनी याबाबत चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस हवालदार एम. बी. बोरसे तपास करीत आहेत. मागील दोन ते तीन महिन्यांपासून पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पीएमपी प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या तक्रारी वाढीस लागल्या आहेत. बाहेरगावाहून आलेले प्रवासी, महिला, विशेषत: ज्येष्ठ महिलांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे.
......
पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलांवर पाळत ठेवत गर्दीच्या वेळी ज्येष्ठ महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या तसेच पाटल्या या प्रकारचे दागिने कटरच्या सहाय्याने कापून नेली. त्याबरोबरच पिशवीतील दागिने, खिशातील रोकड लांबविण्यात आली आहे. चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने प्रवासी चिंतेत आहेत. गेल्या काही महिन्यात पीएमपी प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या गुन्ह्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आठवड्यातून किमान तीन ते चार तक्रारी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत.