पॅसेंजर गाड्या बंद, ४० स्थानकांवर केवळ बावटा दाखविण्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:21 AM2021-09-02T04:21:30+5:302021-09-02T04:21:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेल्वे प्रशासनाने अद्याप पॅसेंजर रेल्वेला परवानगी दिली नाही. त्यामुळे पुणे विभागातील १२ गाड्या बंद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रेल्वे प्रशासनाने अद्याप पॅसेंजर रेल्वेला परवानगी दिली नाही. त्यामुळे पुणे विभागातील १२ गाड्या बंद आहे. त्यामुळे छोट्या स्थानकांवर फक्त गाड्यांच्या परिचालनचे काम सुरू आहे. पुणे विभागातील सत्तर पैकी चाळीस स्थानकांवर गाड्यांना केवळ बावटा (सिग्नलकरिता हिरवा किंवा लाल रंगाचे कापड) दाखविण्याचे काम सुरू आहे.
रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेस, तसेच सुपरफास्ट दर्जाच्या तर काही मार्गांवर, हमसफर व शताब्दी सारख्या महत्वाच्या गाड्या सुरू केल्या. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांची हक्काची व कमी तिकिटात प्रवास घडविणारी पॅसेंजर गाड्या अद्यापही बंद आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांना आपली आर्थिक परिस्थिती नसताना एक्स्प्रेसचे तिकीट काढावे लागत आहे. पुणे विभागात लहान-मोठे मिळून ७० रेल्वे स्थानक आहेत. त्यापैकी वेगवेगळ्या मार्गांवरचे ४० स्थानके हे रोड साईड ( छोटे स्थानके) आहे. या स्थानकावर पॅसेंजर रेल्वे सुरू असताना तिकीट देण्याचे काम सुरू होते. आता प्रवासी नाहीत. केवळ पॉईन्स्टसमन अथवा स्टेशन मास्टर्स येणाऱ्या-जाणाऱ्या गाडयांना हिरवा झेंडा दाखविण्याचे काम करीत आहे.
बॉक्स 1
या पॅसेंजर बंद
पुणे स्थानकावरून धावणाऱ्या जवळपास बारा पॅसेंजर गाड्या बंद आहेत. त्या अद्यापही सुरू झाल्या नाहीत. यात पुणे - निझामाबाद, पुणे - मनमाड, पुणे -सोलापूर , पुणे - दौंड, शिर्डी - मुंबई, पुणे - सातारा , पंढरपूर - मुंबई, पनवेल - बारामती, आदी पॅसेंजर अद्याप बंद आहेत. तर पुणे ते दौंड दरम्यान धावणारी डेमू देखील केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यासाठीच धावत आहे.
बॉक्स २
ही स्थानके केवळ बावट्यापुरती :
सासवड, फुरसुंगी, आळंदी, शिंदवणे, आंबले, राजेवाडी, जेजुरी, दौंडज, नीरा , लोणंद, वठार,पालसी,जरडेश्वर, मांजरी बुद्रुक, लोणी, उरली, यवत, कुटंबाव, केडगांव, कडेठाण, पाटस, आदी स्थानकांचा समावेश आहे.
कोट १
पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याचा अजून निर्णय झाला नाही. त्याबाबत काही निर्णय झाला तर त्याची सूचना देऊन लागलीच अंमलबजावणी केली जाईल. छोट्या स्थानकावर परिचालनाच्या दृष्टीने कामे सुरू आहे.
मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे
कोट २
पुणे स्थानकावरून सर्व प्रकारच्या प्रवासी गाड्या धावत आहे. मात्र, पॅसेंजर गाड्यांवरच निर्बंध लावले आहे. ते तत्काळ हटविले पाहिजे. देशातला खूप मोठा वर्ग पॅसेंजर गाडीतून व जनरल डब्यातून प्रवास करतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तत्काळ पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात.
राजेश गायकवाड, प्रवासी.