प्रवाशांनी रोखली डेक्कन एक्स्प्रेस
By Admin | Published: May 1, 2016 03:02 AM2016-05-01T03:02:59+5:302016-05-01T03:02:59+5:30
डेक्क्कन क्वीनच्या डब्यातील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने प्रवाशांनी डेक्कन क्वीन छत्रपती शिवाजी टर्मिनल (सीएसटी) स्थानकावर तब्बल पाऊण तास रोखून धरली.
पुणे : डेक्क्कन क्वीनच्या डब्यातील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने प्रवाशांनी डेक्कन क्वीन छत्रपती शिवाजी टर्मिनल (सीएसटी) स्थानकावर तब्बल पाऊण तास रोखून धरली. प्रवाशांकडून वारंवार तक्रार करूनही रेल्वे प्रशासनाकडून त्यास दाद दिली जात नसल्याने या डब्यातील प्रवाशांनी तीन वेळा चेन ओढून गाडी थांबविली. पुणे-मुंबई प्रवास करणारा नोकरदार वर्ग, व्यापारी तसेच दैनंदिन कामानिमित्ताने मुंबईला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
या गाडीला सुमारे १८ डबे आहेत. त्यात पाच डबे वातानुकूलित असून, २ एसी डबे पासधारकांसाठी तर ३ डबे आरक्षित आहेत. ही गाडी सायंकाळी ५ वाजून १0 मिनिटांनी सीएसटी वरून सुटते. तर पुण्यात रात्री ८ वाजून ३0 मिनिटांनी पोहचते. सायंकाळी ही गाडी स्टेशनवर येताच एका एसी बोगीतील वातानुकूलित यंत्रणा बंद होती. त्यामुळे एका प्रवाशाने चेन ओढली. त्यानंतर पुन्हा गाडी सुरू होताच दोन वेळा चेन ओढण्यात आली. इतर प्रवाशांनी गोंधळ घातला. त्यानंतर सुमारे ३५ ते ४0 मिनिटांनी गाडी पुण्याकडे रवाना झाली. दरम्यान, मुंबईहून गाडी उशिरा निघाल्याने पुण्यातही ती अर्धा ते पाऊण तास उशिरा पोहोचणार असल्याने त्यानंतर येणाऱ्या इतर गाड्यांच्या वेळेत बदल होणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
ही गाडी सकाळी मुंबईत पोहोचल्यानंतर वातानुकूलित यंत्रणेसाठी असलेल्या डब्यातील बॅटरी चार्ज करणे ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यानुसार, प्रत्येक डब्याला एक अटेंडंट नेमण्यात आलेला असतो. त्यांनी आपल्या आपल्या डब्याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. त्यातच उकाड्याने प्रवासी हैराण असल्याने एसी सुरू असणे आवश्यक आहे. मात्र, प्रशासनाकडून त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असून, प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक आहे.
- हर्षा शहा (रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा)