प्रवाशांनो, पीएमपी बसमधल्या सूचना वाचल्या का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 10:00 PM2020-01-27T22:00:00+5:302020-01-27T22:00:02+5:30

बसमध्ये तब्बल १७ सूचना झळकणार 

Passengers, did you read the instructions in the bus? | प्रवाशांनो, पीएमपी बसमधल्या सूचना वाचल्या का?

प्रवाशांनो, पीएमपी बसमधल्या सूचना वाचल्या का?

googlenewsNext
ठळक मुद्दे‘पीएमपी’बसमध्ये या सुचना लावण्यासंदर्भात परिपत्रकप्रशासनाकडून चोरट्यांपासून सावध राहण्याची सुचना देणारा फलक लावणार

पुणे : सार्वजनिक बसमध्ये गेल्यानंतर साधारणपणे महिला, ज्येष्ठ, दिव्यांगांसाठी राखीव आसन, धुम्रपानास मनाई, हेल्पलाईन, दरवाजाजवळ उभे राहू नका अशा काही ठराविक सुचना नजरेस पडतात. पण आता पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमध्ये तब्बल १७ सूचना झळकणार आहेत. बसमध्ये वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर ‘खिसे कापूपासून सावध रहा’ही सुचनाही त्यात असेल. 
‘पीएमपी’चे मुख्य अभियंता सुनील बुरसे यांनी बसमध्ये या सुचना लावण्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. अनेक बसमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय, पीएमपी आदींच्या नियमावलीप्रमाणे आवश्यक स्टीकर्स किंवा फलक नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत प्रवासी, स्वयंसेवी संस्थांकडून यापूर्वी तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सर्व बसचे निरीक्षण करून सर्व सुचनांचे स्टीकर्स बसमध्ये लावण्यासंदर्भात सर्व आगारातील अभियंत्यांना कळविले आहे. त्यांना १७ सुचनांची यादी पाठविली असून तात्काळ बसमध्ये सुचना लावून बसनिहाय अहवाल सादर करण्याचे आदेश बुरसे यांनी दिले आहेत. 
सध्या पीएमपीच्या बसमध्ये प्रामुख्याने राखीव आसने, स्वच्छता राखा, तक्रार किंवा सुचनांसाठी हेल्पलाईन क्रमांकाची माहिती लिहिलेली दिसते. पण त्याकडे अनेक प्रवाशांकडून दुर्लक्ष केले जाते. आता प्रशासनाकडून १७ सूचना लावणार आहेत. त्यामध्ये प्रमुख सुचनांसह विना तिकीट प्रवास केल्यास ३०० रुपये दंड, पुढे सरकत रहा, अनधिकृत जाहिराती केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, आसनाखाली संशयास्पद वस्तू आढळल्यास वाहकास सांगा, ३ ते १२ वर्षापर्यंत अर्धे व १२ वर्षापुढे पूर्ण तिकीट, राखीव आसनांचा आदर करा, गर्भवती महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना पुढील दरवाजातून प्रवासास मुभा आदी सुचनांचा समावेश आहे. पण या सुचनांचे प्रवाशांकडून किती पालन होते, हे पाहणे औत्स्तुक्याचे ठरणार आहे. कारण बसमधील डाव्या बाजूची सर्व आसने महिलांसाठी काही वर्षांपासून राखीव आहेत. याबाबतची सुचना ठळकपणे लावलेली असते. पण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करून पुरूष प्रवाशांकडून या जागा बळकावल्या जातात. याबाबत अनेकदा वाहक व प्रवाशांमध्ये वाद झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
--
 खिसे कापूंपासून सावध
मागील काही दिवसांपासून बसमधील चोºयांच्या घटना वाढल्या आहेत. महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. बसमधील गर्दीमध्ये प्रवाशांची पाकिटे चोरून नेली जातात. त्यामुळे प्रशासनाकडून चोरट्यांपासून सावध राहण्याची सुचना देणारा फलक लावणार आहे. 

Web Title: Passengers, did you read the instructions in the bus?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.