‘शिवनेरी’ च्या प्रवासी संख्येत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 11:23 AM2019-09-23T11:23:02+5:302019-09-23T11:41:50+5:30
मागील दहा वर्षांपासून एसटीच्या सेवेत शिवनेरी ही प्रतिष्ठेची बससेवा आहे...
पुणे : तिकीटदरात कपात केल्यानंतर शिवनेरी बसला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत चालला आहे. ८ जुलैपासून पुणे-मुंबईदरम्यान ६० हजार प्रवाशांची भर पडली आहे. मागील महिन्यात सातत्याने विस्कळीत राहिलेल्या रेल्वेने शिवनेरीला आधार दिला आहे.
मागील दहा वर्षांपासून एसटीच्या सेवेत शिवनेरी ही प्रतिष्ठेची बससेवा आहे. पुणे -मुंबई व पुणे-औरंगाबाद या शहरांदरम्यान ही सेवा सुरू आहे. या सेवेकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी दि. ८ जुलै रोजी तिकीट दरामध्ये ८० ते १०० रुपयांपर्यंतची कपात केली होती. त्यामुळे पुणे स्टेशन ते दादर व स्वारगेट ते ठाणेदरम्यानचे तिकीट दर ५२० रुपयांवरून ४४० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. तर स्वारगेट ते दादर मार्गाचे दर ५४० वरून ४६० तर बोरीवली ते स्वारगेटदरम्यानचे दर ६१५ वरून ५२५ रुपयांपर्यंत खाली आले. हे दर कमी केल्यानंतर प्रवासी संख्येत वाढ होत असून मागील वर्षीच्या तुलनेत या कालावधीत सुमारे ६० हजार प्रवासी वाढले आहेत, असा दावा एसटी महामंडळाने केला आहे.
वाढलेले तिकीटदर व ओला- उबेरसारख्या टॅक्सी सेवेशी स्पर्धा यामुळे शिवनेरीच्या प्रवासी संख्येमध्ये मोठी घट झाली होती. सध्या ११८ शिवनेरी बसच्या माध्यमातून सुमारे २७५ फेऱ्या होत असून, शनिवार, रविवार व सोमवारी त्यामध्ये वाढ करण्यात येते.
..........
व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टममधून बसचालकांवर लक्ष
दादर ते पुणे स्टेशन या मार्गावर दर पंधरा मिनिटाला सकाळी ५ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत ही बस धावते. प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी पुणे-मुंबई मार्गावरील फुडमॉलसारख्या थांब्यावर थांबण्याचा वेळ कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टमच्या माध्यमातून बसचालकांवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.