पुण्यात २० रुपयासाठी रिक्षाचालकाने केला प्रवाशाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 04:36 PM2018-06-18T16:36:43+5:302018-06-18T16:45:21+5:30
अवघ्या २० रुपयांच्या वादामुळे प्रवाशाचा खून करण्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.शहरातील रविवार पेठ भागात शनिवारी ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली.
पुणे : अवघ्या 20 रुपयाच्या वादातून रिक्षाचालकाने केलेल्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना रविवार पेठ भागात शनिवारी घडली आहे. तानाजी धोंडीराम कोरके असे मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अतुल उर्फ ईश्वर हराळे व रोहन गोडसे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत तानाजी कोरके रिक्षा चालक अतुल उर्फ ईश्वर हराळे याच्या रिक्षात पुणे स्टेशनपासून बसला तो रविवार पेठ व गणेश पेठ दरम्यान उतरला. त्यावेळी मीटरनुसार रिक्षाचे भाडे एकूण ४० रुपये झाले होते. मात्र तानाजी यांच्याकडे २०रुपयेच असल्याने वादाला सुरुवात झाली. त्यानंतर आरोपींनी साथीदारांच्या मदतीने तानाजीला लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरु केली. काही वेळांनी पोलिसांना घटना समजताच त्यांनी आरोपीच्या रिक्षातून त्याला ससून हॉस्पिटलला उपचारासाठी नेले, मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. अखेर घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यावर फरासखाना पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे.दरम्यान तानाजी हा मूळ लातूरचा रहिवासी असून गेले आठ वर्ष पुण्यात राहत असल्याचे समजते. अवघ्या वीस रुपयांसाठी जीव गेलेल्या या निर्दयी प्रकारची चर्चा सध्या शहरात सुरु आहे.