क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी; जादा पैसे, बसटॉपवर विळखा, पुण्यात अवैध रिक्षांचा सुळसुळाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 13:47 IST2024-12-06T13:45:58+5:302024-12-06T13:47:26+5:30

पोलीस व आरटीओकडे तक्रार केली जाते. याबाबत पाठपुरावा केला जातो. मात्र, कारवाई केली जात नाही. यांच्यावर कोणाचा आशीर्वाद? नागरिकांचा सवाल

Passengers over capacity Excessive money rickshaws at bus stops illegal rickshaws in Pune | क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी; जादा पैसे, बसटॉपवर विळखा, पुण्यात अवैध रिक्षांचा सुळसुळाट

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी; जादा पैसे, बसटॉपवर विळखा, पुण्यात अवैध रिक्षांचा सुळसुळाट

पुणे : स्वारगेट, शिवाजीनगर वाकडेवाडी स्थानकात दररोज राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो प्रवाशांची ये-जा करतात. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या स्वारगेट, शिवाजी नगर, पुणे स्टेशन या स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. बसस्थानकाच्या बाहेर अवैध रिक्षा प्रवासी वाहतुकीचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे अवैध रिक्षा प्रवासी वाहतूक धोकादायक झाली असून, याचा महिला व लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवैध वाहतूक करणाऱ्यांवर आशीर्वाद कोणाचा आहे असा सवाल करीत अशा सहाचाकी व पॅगोवरही कारवाई करावी करण्याची मागणी प्रवाशांच्याकडून केली जात आहे. यावर वाहतूक पोलिस व आरटीओकडे तक्रार केली जाते. याबाबत पाठपुरावा केला जातो. मात्र, कारवाई केली जात नाही. यामुळे अशा अवैध वाहतूक करणाऱ्या पॅगो, रिक्षावर आशीर्वाद कोणाचा, असा सवाल नागरिक करीत आहेत.

रिक्षातून धोकादायक वाहतूक 

स्वारगेट, शिवाजीनगर बसस्थानकात खासगी गाड्यांचे एजंट प्रवाशांना कमी तिकिटाचे आमिष दाखवून प्रवासी पळवले जातात, तर काही वेळा जादा पैसे घेऊनही प्रवाशांना त्रास दिला जातो. तसेच सहा आसनी रिक्षांचा अडथळा सहन करावा लागत आहे.

स्वारगेट जेधे चौकातील सद्य:स्थिती

 शहरातील मध्यवर्ती असणारा जेधे चौक स्वारगेट प्रवेशद्वार येथे रिक्षाचा विळखा असतो. बेशिस्त रिक्षाचालक कोठेही रिक्षा थांबून प्रवाशांची लूटमार करीत आहेत, तर वाकडेवाडी एसटी बसस्थानकाबाहेरही रिक्षाचा अडथळा असून प्रवाशांची लूटमार होत आहे. मात्र, स्वारगेट बसस्थानकांत बाहेरचे खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांचे एजंट, तर प्रवेशद्वाराबाहेर पडल्यावर रिक्षाचा विळखा पडलेला असतो. यातून अव्वा की सव्वा भाडे सांगून प्रवाशांची लूटमार केली जाते. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

शहरात ५०० पेक्षा जास्त अवैध रिक्षा वाहतूक

शहरात मुख्य चौकातून स्वारगेट, पद्मावती, हडपसर, वारजे, औंध, सिंहगड, धायरी, वारजे माळवाडी भागातून सध्या राजरोसपणे ५०० पेक्षा जास्त विनापरवाना अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. यामुळे या वाहतुकीमुळे शहरातील रस्त्यावर अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे सध्या टप्प्याटप्प्यांनी होणारी रिक्षा वाहतूक कायमस्वरूपी बंद व्हावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

अवैध रिक्षातून प्रवासी वाहतूक

याभागातून होते ६ आसनी रिक्षा वाहतूक शहरात स्वारगेट ते कात्रज, स्वारगेट ते सिंहगड, धायरी, वडगाव स्वरागेट ते हडपसर, अप्पर याभागातून रिक्षा वाहतूक होत आहे. तर काही भागातून रिक्षावाल्यांना टप्पा-टप्पानी वाहतूक परवानगी असली तरी कात्रज ते पद्मावतीपर्यंत सर्रास वाहतूक होत असली तर पुढे ती स्वारगेटपर्यंत धावत आहे, तर दांडेकर पूल ते वडवाव, धायरी भागाकडे मोठ्या प्रमाणात ६ आसनी रिक्षा सुरू आहेत. तरी वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

नाईलाजस्तव प्रवाशांना सहा आसनी रिक्षाचा प्रवास

वाहतूकदार लहान मुलांचे कोणतेही भाडे घेत नाहीत, शिवाय प्रवासी सांगतील त्या ठिकाणी वाहन उभे करण्यात येते. या फायद्याच्या गोष्टींमुळेही बसऐवजी प्रवाशांकडून सहा आसनी रिक्षा सेवेला प्राधान्य दिले जाते. अर्थात प्रवाशांच्या दृष्टीने या जमेच्या बाजू असल्या तरी खासगी प्रवासी वाहतूक ही तितकीच धोकादायकही आहे. चुकून अपघात झाल्यास जबाबदार कोण? यामुळे सुरक्षितेसाठी प्रवाशांनी अवैद्य रिक्षातून वाहतूक करणे टाळावे.

अवैद्य वाहतुकीमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा ताण

शहरातील मुख्य रस्त्यांवर अवैद्य रिक्षा वाहतुकीमुळे रस्त्यांवर याचा ताण पडत आहे. यामुळे सातारा रस्ता, हडपसर रस्ता, सिंहगड रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे इतर वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

रिक्षाचालकांनी आरटीओच्या नियमांनुसार प्रवासाची वाहतूक करावी. शहरात टप्पा-टप्पांनी सहा आसनी अवैद्य रिक्षा वाहतुकीमुळे प्रामाणिकपणे रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांवर परिणाम होतो. तसेच अपघात झाल्यावर जबाबदार कोण? यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी. -अशोक साळसकर, शिवनेरी रिक्षा संघटना

विटावरून पुणे येथे प्रवास करून स्वारगेटला आलो असता. बस स्थानकावरून बाहेर पडताच रिक्षाचा विळखा पाहायला मिळाला. धायरी जाणे होते स्वारगेट येथे सहा आसनी रिक्षातून गेलो असता सहापेक्षा जास्त प्रवासी होते. -रेखा भिंगारदेवे, प्रवासी महिला

Web Title: Passengers over capacity Excessive money rickshaws at bus stops illegal rickshaws in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.