एसटी बस पाठोपाठ रस्त्यावर धावू लागलेल्या 'ट्रॅव्हल्स'कडे प्रवाशांंनी फिरवली पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 06:20 PM2020-09-08T18:20:04+5:302020-09-08T18:21:44+5:30
सध्याचा पितृ पंधरवडा तसेच अधिक मासामुळे सण-उत्सव पुढे गेल्याने प्रवाशांसाठी वाट पाहावी लागणार
पुणे : एसटी बससेवेपाठोपाठ खासगी ट्रॅव्हल्स धावु लागल्या असल्या तरी प्रतिसाद अत्यल्प आहे. फिजिकल डिस्टन्सिंगमुळे निम्मेच प्रवासी घेणे बंधनकारक आहे. पण तेवढेही प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे ट्रॅव्हल्स सुरू होऊनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने १० टक्क्यांहून कमी बस मार्गावर धावत आहेत. त्यातच सध्याचा पितृ पंधरवडा तसेच अधिक मासामुळे सण-उत्सव पुढे गेल्याने प्रवाशांसाठी वाट पाहावी लागणार आहे.
लॉकडाऊनमुळे मागील पाच महिने बंद असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सची सेवा १ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. पुण्यातून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह अन्य राज्यांतही खासगी ट्रॅव्हल्स जातात. प्रामुख्याने उन्हाळी सुट्टी, दिवाळी, गणेशोत्सव तसेच इतर काही सण-उत्सवाच्या काळात खासगी बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतो. लॉकडाऊनपुर्वी दररोज पुणे व परिसरात १४०० ते १५०० बसची येजा होत होती. सुट्यांच्या हंगामात त्यामध्ये वाढ व्हायची. पण कोरोना संकटामुळे पुर्ण चित्र बदलल्याचे दिसते. नागरिकांकडून बाहेरगावी प्रवास करणे टाळले जात आहे. एसटी बससेवेलाही अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. तोच अनुभव ट्रव्हल्स चालकांनाही येत आहेत.
ट्रॅव्हल्सला आंतरजिल्हा प्रवासासाठी मान्यता देण्याची जोरदार मागणी वाहतुकदार संघटनांकडून केली होती. पण ट्रॅव्हल्स सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसााद नसल्याने त्यांची निराशा होत आहे. सध्या पितृ पंधरवडा सुरू असल्याने अनेकजण प्रवास करण्याचे टाळतात. त्यातच पुढे अधिक मास आहे. त्यामुळे सण-उत्सव एक महिना पुढे गेले आहेत. त्याचा फटका या व्यवसायाला बसणार आहे.
-------------
लॉकडाऊन काळात व्यवसाय नसल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या बससेवा सुरू होऊनही प्रवासी नसल्याने बस मार्गावर येत नाहीत. तोटा सहन करून बस चालवाव्या लागत आहेत. त्यामुळे काही ट्रॅव्हलचालकांनी तिकीट दर वाढविल्याचे दिसते. पण हे दर एसटीच्या दीड पटीतच आहेत.
- बाळासाहेब खेडेकर, अध्यक्ष, पुणे जिल्हा लक्झरी बस ओनर्स असोसिएशन
--------------
लॉकडाऊनपुर्वी प्रसन्न पर्पलच्या दररोज १३० बस मार्गावर असायच्या. सध्या केवळ चार गाड्या आहेत. प्रवासीच नसल्याने खुप कमी बस धावत आहेत. त्यातच सध्या पितृपक्ष असून यंदा अधिक मासही आहे. त्यामुळे इतक्यात प्रवासी संख्या वाढणार नाही. नवरात्र सुरू झाल्यानंतर प्रवासी वाढण्याची अपेक्षा आहे.
- प्रसन्न पटवर्धन, अध्यक्ष, बस अॅन्ड कार ऑपरेटर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया