'व्हीटीएस' चा बोजवारा, प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळत थांबावे लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:14 AM2021-08-24T04:14:36+5:302021-08-24T04:14:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्रवाशांना घरबसल्या आपल्याला ज्या एसटीने प्रवास करायचा आहे, त्या एसटीचे लाईव्ह लोकेशन समजावे, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रवाशांना घरबसल्या आपल्याला ज्या एसटीने प्रवास करायचा आहे, त्या एसटीचे लाईव्ह लोकेशन समजावे, म्हणून राज्य परिवहन महामंडळाने बहुतांश गाडीत व्हीटीएस (व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम) बसविली. मात्र याला पूरक असणारी माहिती यंत्रणेत समाविष्ट करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले नाही. परिणामी या यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने या संदर्भातला ॲप लाँचिंग करणे पुढे ढकलले आहे. त्यामुळे प्रवाशांना बसची माहिती मिळविण्यासाठी बसस्थानकावरच ताटकळत बसावे लागणार आहे.
पुणे विभागातील ९६७ गाड्यांना व्हीटीएस प्रणाली बसविण्यात आली आहेत. तसेच ही प्रणाली पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीमला जोडलीदेखील आहे. मात्र अनेक विभागांतील कर्मचाऱ्यांना याचे प्रशिक्षण न मिळाल्याने अनेकदा चुकीची माहिती प्रसारित होत आहे. त्यामुळे अनेक बसस्थानकांवर या यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. परिणामी राज्य परिवहन महामंडळाने १५ ऑगस्ट रोजी याची माहिती देणाऱ्या मोबाईल ॲपचे उद्घाटन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे.
बॉक्स 1
गाडीचे लोकेशन समजणार :
व्हीटीएस प्रणालीत जीपीएसचा देखील अंतर्भाव आहे. त्यामुळे एसटी डेपोपासून सुमारे ३० किमी अंतरावर कोणतीही एसटी गाडी आल्यास त्याची माहिती पीआयएस (पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम) समजेल. यात संबंधित गाडी किती वाजता स्थानकवर येईल, तिचे लाईव्ह लोकेशन कोणते आहे, याची माहिती मिळते.
बॉक्स 2
बसस्थानकावर लागले मोठे स्क्रीन :
प्रवाशांना गाडीची माहिती मिळावी याकरिता पुणे विभागातील सर्व बसस्थानकांवर मोठे स्क्रीन लावण्यात आले. या स्क्रीनवर गाडी कुठे आहे, ती किती वाजता येईल, कोणत्या फलाटावर येईल आदी माहिती स्क्रीनवर दिसते. त्यामुळे प्रवाशांना नियंत्रकाकडे जाण्याची गरज नाही.
बॉक्स 3
१५ ऑगस्टचा मुहूर्त हुकला :
बसगाड्यात बसविलेली व्हीटीएस प्रणाली ही मोबाईल अॅपला जोडण्यात येऊन प्रवाशांना घरबसल्या एसटीचे लाईव्ह लोकेशन समजणार होते. १५ ऑगस्ट रोजी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते ह्या अॅपचे उद्घाटन होणार होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे अॅप लाँच पुढे ढकलावे लागले.
कोट : पुणे विभागातील ९६७ एसटी गाड्यांना व्हीटीएस प्रणाली बसविण्यात आली आहे. ती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली आहे. मात्र अॅप लाँचचा कार्यक्रम का रद्द झाला, याबाबत माहिती नाही. आम्ही आमच्या विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.
ज्ञानेश्वर रनवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ, पुणे