’पासपोर्ट’’ सीम्मोलंघनाचे खरे प्रतीक : ज्ञानेश्वर मुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 05:02 PM2018-10-03T17:02:35+5:302018-10-03T17:15:42+5:30
आपण जोपर्यत देशाच्या बाहेर पडणार नाही तोपर्यत आपल्यातील संकुचित भावना संपुष्टात येणार नाही.
पुणे : जगभरातील व्यावसायिकांनी भारतात येवून कंपन्या स्थापन केल्या आहेत. रोजगार, शिक्षणाच्या विविध संधी परदेशात असून त्याचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आता भारतीय विद्यार्थी जात आहेत. हे चित्र समाधानकारक आहे. मात्र, गावचा, महाराष्ट्राचा पर्यायाने देशाच्या विकासासाठी सीमा ओलांडण्याची गरज आहे. त्यासाठी भविष्यात प्रत्येक विद्यार्थ्याकडे पासपोर्ट असणे महत्वाचे असून पासपोर्ट सीमोल्लंघनाचे खरे प्रतीक असल्याचे परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केले.
नवभारत निर्मिती व संकल्प सिध्दी यांच्या संयुक्त विद्यमाने माती,पंख आणि आकाश या उपक्रमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पासपोर्ट देण्याच्या योजनेचा शुभारंभ मुळे यांच्या हस्ते पार पडला. एस पी महाविद्यालयातून या योजनेला प्रत्यक्षात सुरुवात झाली. महाविद्यालयाच्या रमाबाई सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड. एस.के.जैन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमाळकर, भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक दीपक पोटे, प्रा. दिलीप सेठ, सतीश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
मुळे म्हणाले, देशातील 125 कोटीपैकी केवळ 8 कोटी लोकांकडे पासपोर्ट आहे. या आकडेवारीवरुन अद्याप देशात पासपोर्टविषयी व्यापक पध्दतीने काम करण्याची गरज असल्याचे लक्षात येईल. सुरुवातीच्या काळात विदेश सेवेत काम करत असताना स्वत:कडे पासपोर्ट नव्हता. तसेच आईच्या पासपोर्टवर तिची सही म्हणून अंगठा होता. एक निरक्षर महिला केवळ पासपोर्टच्या आधारे दुस-या देशात जाऊ शकते. त्याकरिता पासपोर्ट किती आवश्यक आहे, याची खात्री त्यावेळी झाली. त्यानंतर शहरांबरोबरच ग्रामीण भागात देखील पासपोर्ट विषयी जनजागृती केली. सध्या दरवर्षी पासपोर्ट विभागाच्यावतीने 1 कोटी 10 लाख पासपोर्ट वितरीत केले जातात. त्यात दररोज 60 हजार पासपोर्टवर कार्यालयाच्या वतीने कार्यवाही केली जाते. आणि तब्बल दोन लाख एसएमएस पासपोर्टच्या वेगवेगळ्या कार्यालयांतून ग्राहकांपर्यत पोहचविले जात आहेत. आपण जोपर्यत देशाच्या बाहेर पडणार नाही तोपर्यत आपल्यातील संकुचित भावना संपुष्टात येणार नाही. सध्याचे संकुचित राजकारण, धर्मकारणाला दिलेली राजकारणाची जोड यामुळे संकुचित विचारांचे डबके तयार झाले असून मुळे यांनी विद्यार्थ्यांंना आपल्या प्रगतीकरिता पासपोर्टच्या माध्यमातून भरारी घेण्याचा सल्ला दिला.
केवळ परदेशी जाण्याकरिता पासपोर्ट असे नव्हे तर त्यानिमित्ताने विविध देशांमधील संस्कृती, सामाजिक, राजकीय परिस्थिती समजून घेण्यास मदत होते. ज्ञानाच्या नवीन वाटा शोधण्यास उपयोगी पडणारे महत्वाचे साधन म्हणून पासपोर्टचा उल्लेख करता येईल. बाहेर देशांतील उपयोगी गोष्टी आपल्याकडे येण्याकरिता स्थलांतर महत्वाचे असून त्यासाठी पासपोर्टशिवाय पर्याय नसल्याचे कुलगुरु डॉ.करमळकर यांनी सांगितले.
*पवार दोन महिने पासपोर्टच्या प्रतिक्षेत
एका अभ्यास दौ-यासाठी इंदिरा गांधींनी शरद पवार यांना परदेशी जाण्यास सांगितले. त्याकरिता यांची विशिष्ट समितीत निवड देखील करण्यात आली होती. परदेशी जाण्यासाठी पवारांना तातडीने पासपोर्टची गरज होती. त्यांनी पासपोर्ट कार्यालयाकडे अर्ज केला. परंतु पोलिस पडताळणी करण्याक रिता झालेला विलंब यामुळे पवार यांना तब्बल दोन महिने पासपोर्टची वाट बघावी लागली. जिथे पवार सारख्या नेत्यांना देखील पासपोर्टसाठी वाट पाहवी लागली तिथे सर्वसामान्यांची काय स्थिती असेल? परंतु आता परिस्थितीत बराच फरक पडल्याचे ज्ञानेश्वर मुळे यांनी सांगितले.