पाच वर्षांत ४४० जनावरांची बिबट्यांनी केली शिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 01:16 AM2019-03-23T01:16:56+5:302019-03-23T01:17:17+5:30
जुन्नर आणि आंबेगाव तालुका तेथील ऐतिहासिक घटनांपेक्षा बिबट्यांकडून केल्या जाणाऱ्या शिकारीनेच अधिक गाजतो आहे. गेल्या पाच वर्षांत बिबट्यांनी गावातील पाळीव जनावरांवर हल्ला करत तब्बल ४४० हून अधिक जनावरांची शिकार केली आहे.
- रामनाथ मेहेर
ओतूर - जुन्नर आणि आंबेगाव तालुका तेथील ऐतिहासिक घटनांपेक्षा बिबट्यांकडून केल्या जाणाऱ्या शिकारीनेच अधिक गाजतो आहे. गेल्या पाच वर्षांत बिबट्यांनी गावातील पाळीव जनावरांवर हल्ला करत तब्बल ४४० हून अधिक जनावरांची शिकार केली आहे. वनविभागाकडून या बिबट्यांना योग्य ठिकाणी सोडण्यास यश मिळाले नाही की नागरिकांना त्यांच्या दहशतीपासून मुक्त करणे झाले नाही. मात्र, बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे जनावरांपासून मुकाव्या लागणाऱ्या ग्रामस्थांना नुकसान भरपाई म्हणून वनविभागाने तब्बल ३४ लाख ८२ हजारांची नुकसानभरपाई दिली आहे.
ओतूर आणि परिसरात बिबट्यांचा खुलेआम वावर वाढला आहे. रानावनात वास्तव्य करणारा बिबट्या गावठाण भागात नरजेस पडत असल्याने बिबट्याची ग्रामस्थांच्या मनात चांगलीच धास्ती बसली आहे. रात्रीच्या सुमारास ओतूरच्या शिवाजी रोड पाठीमागील गस्त गल्लीत बिबट्या सर्रास नजरेस पडतो आहे. या परिसरातील डुकरांच्या व भटक्या कुत्र्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली असल्याने येथे दिवसाढवळ्या जाण्यासही नागरिक धजावत नाहीत.
एकट्या जुन्नर तालुक्यात सुमारे चाळीसहून अधिक गावांत बिबट्यांचा वावर असल्याच्या नोंदी वनविभागाकडे आहेत. जंगलात बिबट्याला खाद्य मिळत नसल्याने व डोंगर टेकड्यांच्या सपाटीकरणामुळे तो नागरी वस्तीकडे वळला आहे.
रात्री गावात येऊन शिकार करण्यास झाला सराईत
ओतूर, आंबेगव्हाण, लागाचा घाट, रोहोकडी, शेटेवाडी, अहिंनवेवाडी, बेल्हे, आळे, खोडद, आंबेगाव, जोगा या भागांतच बिबट्या दिसायचा. क्वचितच तो गावातही यायचा अलीकडे मात्र हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. रोहोकडी, ओतूर, सारणी, चिल्हेवाडी येथील डोंगर, ओढे, नाले, नदी, ऊस शेती म्हणजे बिबट्यांची वस्तीच झाली आहे. त्यामुळे ते गावात येऊन शिकार करण्यात सराईत झाले आहेत.
वनक्षेत्रपाल पडतात अपुरे
ओतूर वन विभागाच्या परिमंडल हद्दीत ११ हजार ३०० हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी जुन्नर, ओतूर अशी दोन वनपरिक्षेत्र कार्यालये देखभालीसाठी आहेत.
वनविभागाच्या ब्ीाटनिहाय बिबट्याचे क्षेत्र वाढत आहे. त्यांना जेरबंद करायचे असल्यास वनक्षेत्रपाल आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे.
दोन्ही वनपरिक्षेत्रात बिबट्यांचा मोठा वावर आहे. सुमारे सत्तरपेक्षाही जास्त ठिकाणी बिबट्याचा वावर रोजचा झाला आहे.
बिबट्यांची संख्या वाढली असली तरी पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्नही तितकेच केले जाते.
बिबट्याला मारता येत नाही. त्याला पकडून त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडावे लागते. बिबट्याला मारता येत नाही. त्याला पकडून त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडावे लागते.
बिबट्या अतिशय हिंस्र प्राणी असल्यामुळे त्याला पकडणे तितके सोपे नाही. मात्र, वनविभागाने यंदाच्या वर्षी अनेक ठिकाणी पिंजरे लावून बिबट्या पकडले आहेत. नागरिकांनी सतर्क राहून बिबट्या दिसताच वनरक्षकाला कळविल्यास जास्तीत जास्त बिबटे पकडण्यात मोठी मदत मिळेल, अशी माहिती ओतूर वनपरिमंडल अधिकारी बापू येळे व वनपाल सचिन मोढवे यांनी दिली.