पतंगरावांनी सांस्कृतिक मानवतावाद जपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:09 AM2021-01-10T04:09:57+5:302021-01-10T04:09:57+5:30
पुणे : पतंगराव कदम यांनी सांस्कृतिक मानवतावाद जपत खेड्यातल्या मातीला आणि माणसांना शहरी संस्कृतीत प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, विकासाचे ...
पुणे : पतंगराव कदम यांनी सांस्कृतिक मानवतावाद जपत खेड्यातल्या मातीला आणि माणसांना शहरी संस्कृतीत प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, विकासाचे राजकारण आणि सत्याचे समाजकारण केले. तसेच ज्ञान, विज्ञान आणि समाज परिवर्तनाचे प्रयोग शिक्षण विश्वात रुजवले, शिक्षणाचा ध्येयवाद भारताचा नकाशा ओलांडून परदेशात पोचवला,असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाचे संस्थापक, कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या ७७ व्या जयंती निमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात सबनिस बोलत होते. यावेळी सहकार्यवाह डॉ. एम. एस. सगरे, कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे, कुलसचिव जी. जयकुमार, माजी कुलगुरु एस.एफ. पाटील, विचारभारतीचे संपादक प्रा. मिलिदं जोशी, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. ए.बी. जाधव, उपस्थित होते. याप्रसंगी विचारभारतीच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
मिलिंद जोशी म्हणाले, ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी कोणत्या दिव्यातून जावे लागते. हे डॉ. पतंगराव कदम यांनी स्वत: अनुभवले होते. पुढच्या पिढीच्या वाटयाला हे जीवन येऊ नये म्हणून त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. महानगराबरोबरच ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागात शिक्षण केंद्रे उभे करुन तेथील घटकांना शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्वाचे काम भारती विद्यापीठाने केले.डॉ. कदम यांची ध्येयनिष्ठा, गुणवत्तेचा ध्यास आणि दूरदृष्टी यामुळे भारती विद्यापीठाचा यशाचा आलेख सतत उंचावत राहिला.
ज्योती मंडलिक यांनी सूत्रसंचालन केले डॉ एम एस सगरे यांनी आभार मानले