पतंगराव कदम : शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 05:39 AM2018-03-10T05:39:28+5:302018-03-10T05:39:28+5:30

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी शून्यातून भारती विद्यापीठ या शिक्षणसंस्थेचे देशभर जाळे विणले. राजकारणातही ते पाय रोवून उभे राहिले. तळागाळापर्यंत शिक्षणाच्या प्रसार करणा-या थोर नेत्याला आपण मुकलो असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.

 Patangrao Kadam: The leader who creates the world from zero | पतंगराव कदम : शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता

पतंगराव कदम : शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता

Next

पुणे -  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी शून्यातून भारती विद्यापीठ या शिक्षणसंस्थेचे देशभर जाळे विणले. राजकारणातही ते पाय रोवून उभे राहिले. तळागाळापर्यंत शिक्षणाच्या प्रसार करणा-या थोर नेत्याला आपण मुकलो असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात पतंगराव यांनी ७४व्या वर्षी अखेर घेतला अखेरचा श्वास घेतला.

खेड्यातील विद्यार्थ्यांसाठी स्थापन झाले भारती विद्यापीठ
हडपसरमधील साधना विद्यालयात पतंगराव कदम शिक्षक होते, त्या वेळी खेडेगावातील विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान विषयात गती नसल्याची त्यांना खंत होती. यातून गणित आणि विज्ञान विषयांची स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी भारती विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. त्याकरिताची पहिली बैठक पुण्यातील शासकीय विश्रामगृहाच्या हिरवळीवर भरली होती. वयाच्या विशीत त्यांनी पुण्यातील एका खोलीत भारती विद्यापीठ सुरू केले. त्यांनी लावलेल्या या रोपट्याचा अल्पावधीतच वटवृक्ष झाला. भारती विद्यापीठाच्या छत्राखाली देश व परदेशांमध्ये १८० शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत.
या विद्यापीठात सध्या २ लाख ५० हजार विद्यार्थी शिकत आहेत. दहा हजार प्राध्यापक आहेत. ज्या उत्तम व दर्जेदार संस्था आहेत, त्यांनी केंद्र सरकारकडे अभिमत विद्यापीठाच्या मंजुरीसाठी अर्ज करायचा असतो. केंद्र सरकार तो अर्ज विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठवते. विद्यापीठ अनुदान आयोग तज्ज्ञांची समिती नेमते. परंतु त्यावेळी पुणे विद्यापीठाचे मोठे नाव असताना, आपण अभिमत विद्यापीठ करायला नको, असे भारती विद्यापीठातील प्राध्यापकांचे मत होते. परंतु पतंगरावांनी सर्वांना समजावून सांगितले की, आपण छोट्या गोष्टी करायच्या नाहीत. मोठ्या गोष्टी करायच्या, मोठा विचार करायचा, ध्येयवादाने काम करायचे! त्यावर अभिमत विद्यापीठासाठी प्रस्ताव दिला गेला. १९९६ मध्ये १६ तज्ज्ञ लोकांची भारती विद्यापीठाच्या मान्यतेसाठी कमिटी आली. या कमिटीच्या शिफारशीने सरकारने या विद्यापीठाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला गेला. पतंगरावांनी संस्था नोंद करतानाच घटनेत लिहिले होते की, एक दिवस या संस्थेचे विद्यापीठ होईल. त्यावेळी पुण्यातील लोकांनी त्यांची टिंगल केली, परंतु पतंगरावांनी या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा मिळवून दिलाच.


पतंगराव आणि माझा परिचय १९६४पासून होता. भारती विद्यापीठात मी त्यांच्या बरोबरीनं काम केलं; परंतु आमचं नातं एवढंच नसून त्यांच्या पीएच.डी.साठी मी त्यांचा मार्गदर्शकही होतो. त्या वेळी विद्यार्थी म्हणून संपर्क आला असता त्यांनी आपला वेगळेपणा कधीही जाणवू दिला नाही. कार्यमग्नतेमुळे दिवसा जमायचं नाही, तर रात्री आम्ही त्यांच्या प्रबंधाचं वाचन केलं. त्या वेळी विद्यापीठाच्या संचालकपदावर असूनही त्यांनी एका अतिशय अभ्यासू विद्यार्थ्यांप्रमाणे पीएच.डी. पूर्ण केली. ते आमच्या घरासमोर राहत असल्याने आमची कायम भेट व्हायची. प्रत्येक वेळी 'गुरुजी जय हो' अशी त्यांची हाक यायची. अतिशय दिलदार, मिस्कील असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. भारती विद्यापीठाचा आधारवड आज हरपला आहे.
- डॉ. प्र. चिं. शेजवलकर
(ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ) :

कसबा पेठेत छोट्याशा पत्र्याच्या खोलीत भारती विद्यापीठाचे कार्यालय सुरू केल्यापासून पतंगरावांचा आणि माझा परिचय होता. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. अथक प्रयत्न, चिकाटी, शिक्षणाबद्दल कमालीची ओढ, यातून त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना करून शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचविले. मिनमिळाऊ, सर्वांशी संपर्क असणारा, हसतमुख असा हा नेता होता. त्यांना मी कधीही चिडलेले पाहिलेले नाही. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करणाºया एका थोर नेत्याला आपण मुकलो आहोत. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
- गिरीश बापट (पालकमंत्री)

पतंगराव कदम यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठा ठसा निर्माण केला होता. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. याशिवाय, सहकार क्षेत्रातही त्ंयांनी मोठा ठसा उमटवला. काँग्रसने ज्येष्ठ नेत्यापेक्षा धोरणी राजकारणी गमावला आहे.
- मुक्ता टिळक (महापौर)

पतंगराव कदम यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खदायक आहे. अतिशय गरिबीतून त्यांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक साम्राज्य उभे केले. त्यामागे त्यांची कामावरील अविचल निष्ठा दिसून येते. इतके मोठे साम्राज्य उभे करूनही ते अत्यंत साधे होते. सर्वांशी प्रेमाने वागायचे. अत्यंत मनमिळाऊ असलेल्या या नेत्याच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
- वंदना चव्हाण, (खासदार)

अत्यंत दुर्दैैवी अशी घटना आज घडली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचा शैैक्षणिक, सहकार क्षेत्रात खोल अभ्यास होता. शून्यातून विश्व कसे निर्माण करायचे, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पतंगराव. एक मनमोकळा, दिलदार नेता आणि आमचे ज्येष्ठ सहकारी गमावल्याने काँग्रेसचे फार मोठे नुकसान झाले आहे.
- हर्षवर्धन पाटील,
(माजी मंत्री)

डॉ. पतंगराव कदम यांच्या मृत्यूने महाराष्ट्र एका जाणकार, अभ्यासू आणि कर्तृत्ववान नेत्याला मुकला आहे. लहानपणापासूनच जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अत्यंत सामान्य परिस्थितीतून ते मोठे झाले. शिक्षण, राजकारण आणि समाजकारण अशा सर्व क्षेत्रांत ते यशस्वी झाले. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी हजारो विद्यार्थी घडविले.
- अनिल शिरोळे (खासदार)

डॉ़ पतंगराव कदम हे जनसामान्यांसाठी झटणारे नेते होते़ जेव्हा मी आमदारही नव्हतो़ तेव्हा ते मंत्री होते़ एकदा त्यांना भेटण्यासाठी भारती भवनात गेलो़ भेटायला येणाºयांची गर्दी होती़ मी चिठ्ठी आत पाठविली़ ती पाहून ते स्वत: बाहेर आले़ त्यांनी हात धरून आपल्याबरोबर नेले़ दुसºया पक्षातीलही एका सामान्य कार्यकर्त्यालाही त्यांच्याकडून सन्मानाची वागणूक मिळते, ही गोष्ट आज इतक्या वर्षांनंतरही माझ्या हृदयात अजूनही ताजी आहे़ त्यांच्या निधनाने सर्वांचे प्रेमाने स्वागत करणारा नेता, चांगले नेतृत्व हरपले आहे़ - दिलीप कांबळे (राज्यमंत्री)
काँग्रेस पक्ष मजबूत झाला पाहिजे, या ध्येयाने सतत काम करणारा असा हा नेता होता़ १९८०च्या सुमारास मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो़ त्यांनी भारती विद्यापीठ स्थापन केले होते़ कोथरूड येथे शंकरराव मोरे विद्यालयाची सुरुवात केली होती़ त्या वेळी त्यांनी मला बोलावले़ काँग्रेस पक्ष मजबूत झाला पाहिजे़ कोणी मंत्री अथवा नेत्यांचा कार्यक्रम असेल तर मला सांगा़ मी सर्व मदत करीन, असे सांगितले़ अगदी सुरुवातीपासून त्यांनी आम्हा तरुणांना प्रोत्साहन देण्याचे काम केले़ गांधी घराण्यावर त्यांची निष्ठा कायम होती़ सर्व राजकीय पक्षांशी त्यांचा चांगला संपर्क होता़ प्रत्येकाला मदत करण्याचा त्यांचा दिलदार स्वभाव होता़
- मोहन जोशी (माजी आमदार)
अतिशय सहृदयी नेता आपल्यातून गेला़ कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांवर मार्ग काढण्याचे कौशल्य वादातीत होते़ एकदा त्यांच्या मुंबईतील बंगल्यावर पुणे महापालिकेच्या तिकिटाबाबत बैठक होती़ तीत सुरेश कलमाडीही होते़ दोन-चार जागांवरून काही जणांत हमरीतुमरी झाली़ भांडण विकोपाला गेले़ मी त्या वेळी तेथेच होतो़ ‘शरद, यातून मार्ग काढण्यासाठी तू चांगला सल्ला देशील,’ असे ते म्हणाले़ त्यानंतर आम्ही चर्चा केली़ त्यांना मी योग्य वाटले ते सांगितले़ माझ्या म्हणण्यानुसार त्यांनी इतरांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढला़
- शरद रणपिसे (आमदार)
काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे़ मी एका विद्यार्थ्याला त्याच्या आईसह पतंगराव कदम यांच्याकडे घेऊन गेलो़ काही जणांचे काम मार्गी लावल्यावर ते माझ्याबरोबर मुलगा व महिला पाहून मला म्हणाले, ‘बोल, कोठे अ‍ॅडमिशन हवी आहे?’ तेव्हा मी त्यांना सांगितले, की अ‍ॅडमिशन नको आहे़ त्याची आई घरकाम करते़ हा मुलगा मेरिटमध्ये आला आहे़ अ‍ॅडमिशन मिळाली आहे; पण फीचे पैसे भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत़ तेव्हा ते म्हणाले, ‘अरे, अशा मुलांना अगोदर आणायचे़ इथे कमी मार्क मिळालेले अ‍ॅडमिशनसाठी येतात़ तुम्हाला तर अ‍ॅडमिशन मिळाली आहेच ना,’ असे म्हणून त्यांनी त्या विद्यार्थ्यांची फी जागेवर माफ करून टाकली़ अशा असंख्य गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी मदत करून मोठे होण्यासाठी सहकार्य केले़ - गोपाळ तिवारी (काँग्रेस नेते)

डॉ़ पतंगराव कदम यांच्याबरोबर काम करताना त्यांच्या हजरजबाबीपणाचा अनुभव मी अनेकदा घेतला आहे़ सामान्यांना नेमके काय हवे, याची त्यांना नेमकी जाणीव असायची़ त्यानुसार ते मंत्री म्हणून निर्णय घेत असत. अनेकादा सचिव काम करायचे नसेल तर कायद्याची भाषा वापरून ते कसे करता येणार नाही, याच्या अडचणीचा पाढा वाचायचे़ त्यावरही पतंगराव यांच्याकडे उत्तर असायचे़ ते कसा काही तोडगा सुचवायचे की सचिवाला त्यांचे म्हणणे मान्य करायला लागायचे़ प्रशासनाकडून कसे काम करून घ्यायचे, हे त्यांचे कौशल्य वादातीत होते़
- विनायक निम्हण
(माजी आमदार)

नामदेव ढसाळ हे त्यांच्या शेवटच्या काळात गंभीर आजाराने त्रस्त होते़ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते़ तेव्हा नामदेव मला म्हणाले, पतंगराव कदम हे माझे चांगले मित्र आहेत़ त्यांना फक्त मी अ‍ॅडमिट आहे ते सांग़ मी पतंगराव यांना हे सांगितल्यावर ते त्याच दिवशी

Web Title:  Patangrao Kadam: The leader who creates the world from zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.