निराधारांन आधार देणारे पतंगराव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:34 AM2021-01-08T04:34:26+5:302021-01-08T04:34:26+5:30
सिंधुताई सपकाळ, ज्येष्ठ सामजिक कार्यकर्त्या सत्त्वपरीक्षा घेणाऱ्या परिस्थितीने मला खूप काही शिकवले. पुण्यात आल्यावर मला ममता या माझ्या मुलीला ...
सिंधुताई सपकाळ, ज्येष्ठ सामजिक कार्यकर्त्या
सत्त्वपरीक्षा घेणाऱ्या परिस्थितीने मला खूप काही शिकवले. पुण्यात आल्यावर मला ममता या माझ्या मुलीला शिकवायचे होते. माझी आर्थिक ऐपत नव्हती. मुलीने खूपखूप शिकावे असे वाटत होते, पण मला समोर रस्ताच दिसत नव्हता. तो दिवस मला अजूनही स्पष्ट आठवतो. मी पतंगरावांना भेटायला गेले. आज माझे बऱ्यापैकी नाव झाले आहे. समाज मला ‘माई’ म्हणून आदराने स्थान देतो. त्या वेळी मी एवढी लोकांना माहिती नव्हते. प्रसिद्धीचे वलयही माझ्या पाठीमागे नव्हते. त्यामुळे मी पतंगरावांना माहीत असण्याची शक्यताच नव्हती, पण त्यांच्या कानावर माझ्या कामाची माहिती गेलेली होती. मी भीतभीतच त्यांना भेटायला गेले. माझे डोळे पाणावले होते. मी पतंगरावांना माझी अडचण सांगितली. माझी मुलगी वयाने मोठी आहे. सेवासदनमध्ये पुढच्या शिक्षणासाठी तिला ठेवायचे नाही असे ठरवलेले आहे. मला अनाथ मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घ्यायची आहे. या पार्श्वभूमीवर माझ्या मुलीचे पालकत्व कोण स्वीकारेल, याच विचारात मी आहे. आपण माझ्यासाठी काय करू शकता?
पतंगरावांनी माझ्या बोलण्यावर त्यांची खाली असलेली मान वर केली, माझ्याकडे पाहिले. त्यांच्या त्या पाहण्यात मला एक विश्वास दिसला. माझे काम या ठिकाणी नक्की होणार याची खात्री पटली. त्यांनी माझ्या मुलीला भारती विद्यापीठाने मायेचे छत्र दिले.
तिला एम.एस.डब्ल्यू.करण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. तिचा राहण्याच्या, खाण्याच्या खर्चाचा भार भारती विद्यापीठाने उचलला म्हणून मी निश्चिंत मनाने अनेक अनाथांची आई होऊ शकले. नात्यागोत्यातल्या माणसांसाठी मदतीसाठी कुणीही तयार असते, पण ज्यांची कुठेही ओळख नाही, वशिला नाही, पाठराखण करणारे कोणी नाही, शिफारस करणारे कोणी नाही, अशा गरजू माणसांच्या पाठीशी आभाळाएवढे मन असणारा हा माणूस कायम उभा राहत आलेला आहे. हे विद्यापीठ माणुसकीचे मंदिर आहे. म्हणून या विद्यापीठातली माणसे मला खूप भावतात.
माझ्या संस्थेतली ५-१० मुले मुली दरवर्षी भारती विद्यापीठात उच्च-शिक्षण घेतात. त्यांचा संपूर्ण खर्च भारती विद्यापीठाने उचललेला असतो. माझ्या लेकरांवर पोटच्या पोरांप्रमाणे माया करणारे हे विद्यापीठ आहे. सतत जगाचे भले चिंतणाऱ्या या माणसाचा हातातोंडाशी आलेला घास दैवाने हिसकावून नेला. तरूण पोरगा या जगातून गेला. काळजाला चटका लावणारी ही जखम कशानीही भरून येणारी नाही. पतंगराव आणि आमच्या विजयमाला वहिनी यांनी या दुखातूनही वाट शोधली आणि मुलाच्या नावे ‘अभिजित कदम मेमोरियल फौंडेशन’ची स्थापना केली. आपला मुलगा गेला तरी या जगात अशी हजारो मुले आहेत, ज्यांना
मायेच्या पंखाची गरज आहे, अशा मुलांच्या पाठीशी पतंगराव आणि वहिनीसाहेब सातत्याने उभे राहिले आहेत. त्यांना मायेची ऊब दिली आहे. त्यांचे पालकत्व त्यांनी स्वीकारलेले आहे. पतंगराव नावाच्या महात्म्याच्या विजयमालावहिनी हीच खरी ऊर्जा होती. वहिनीसाहेबांनी भारती विद्यापीठाचे मातृत्व त्यांनी स्वीकारले. पतंगरावांच्या जाण्याने या विद्यापीठाचा बापच गेला.