‘अमृत योजने’चा मार्ग मोकळा

By admin | Published: January 12, 2016 03:57 AM2016-01-12T03:57:38+5:302016-01-12T03:57:38+5:30

झपाट्याने विकास होत असलेल्या बारामती नगरपालिकेला ‘अ’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी वाढीव अनुदानाबरोबरच ‘स्मार्ट सिटी’च्या धर्तीवर शासनाच्या

The path of 'Amrut Yojana' is open | ‘अमृत योजने’चा मार्ग मोकळा

‘अमृत योजने’चा मार्ग मोकळा

Next

बारामती : झपाट्याने विकास होत असलेल्या बारामती नगरपालिकेला ‘अ’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी वाढीव अनुदानाबरोबरच ‘स्मार्ट सिटी’च्या धर्तीवर शासनाच्या ‘अमृत योजने’चा लाभ या शहराला
घेता येणार आहे. यापूर्वी केवळ ‘अ’ वर्ग दर्जा नसल्याने पूर्वीच्या स्मार्ट
सिटी योजनेचा प्रस्ताव नाकारण्यात आला होता. यापूर्वी ‘ब’ वर्ग नगरपालिकेला होता.
राज्यातील ‘पॉवरबाज’ सत्ताकेंद्र असलेल्या बारामती शहराची हद्दवाढ २०१२मध्ये झाली. तेव्हापासूनच नगरपालिकेचा दर्जा वाढणार, अशी चर्चा होती. तसा प्रस्ताव पालिकेने राज्य शासनाला पाठविला होता. वैशिष्ट्यपूर्ण शासकीय इमारती उभारणीचे शहर म्हणून बारामतीचा लौकिक आहे.
शैक्षणिक हबबरोबरच अन्य सुविधा बारामतीमध्ये वेगाने वाढल्या आहेत. रस्ते, पाणी यांसह दळणवळणाची साधने अन्य तालुकास्तरावर झपाट्याने वाढली आहेत. त्याचबरोबर रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण, बारामती ते फलटण-लोणंद रेल्वे मार्गाचे काम आदी प्रश्न सुटले आहेत. बारामतीला जोडणारे सर्व रस्ते चौपदरीकरण झाले आहे. ‘अ’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्यामुळे बारामतीच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे.
बारामतीत रेल्वे, रस्ते, हवाईमार्गासह औद्योगिकीकरण, नागरीकरण वाढले आहे. परंतु, ‘ब’ वर्ग दर्जा असल्यामुळे अनुदान कमी मिळत होते. यापूर्वी शहरांच्या विकासासाठी ‘स्मार्ट सिटी’ योजना
नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये राबविण्यात येत आहे.
राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेत १ लाखापेक्षा अधिक लोकसंख्या ‘अ’ वर्ग दर्जाच्या नगरपरिषदांना या योजनेत सहभागी करून घेण्यात आले. बारामतीचा प्रस्ताव केवळ ‘अ’ वर्ग दर्जा नसल्याने नाकारण्यात आला होता.
आता ‘अ’ वर्गात समावेश झाल्यामुळे राज्य शासनाने नव्याने सुरू केलेल्या ‘अमृत’ सिटी योजनेत या शहराचा समावेश होणार आहे. बारामतीची लोकसंख्या १ लाखापेक्षा जास्त आहे. २०१५-१६ चे अंदाजपत्रक २९१ कोटींहून अधिक आहे. यावर्षीचे अंदाजपत्रकदेखील २९६ कोटींच्या दरम्यान आहे. त्यामुळे आता अमृत योजनेचा लाभ बारामतीकरांना घेता येणार आहे. बारामतीच्या पायाभूत सुविधा वाढलेल्या असताना उर्वरित सुविधांचा लाभदेखील याद्वारे घेता येणार आहे. (प्रतिनिधी)

‘अ’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्यामुळे
सुधारित आकृतिबंध लागू होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी दिली. या अंतर्गत अतिरिक्त मुख्याधिकारी पदासह उपमुख्याधिकारी, अभियंता आदी नव्याने पदे निर्माण होणार आहेत. श्रेणीवाढ होईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्य शासनाने दि. १ जानेवारीलाच बारामती नगरपालिकेचा
समावेश ‘अ’ वर्गात केला. तशी अधिसूचना काढली. आज ‘अ’ वर्ग दर्जाचे पत्र बारामती पालिका प्रशासनाला मिळाले. या श्रेणीवाढीमुळे छोट्या शहराच्या विकास योजनेसाठी राबविण्यात आलेली अमृत योजनेचा लाभ घेता येईल. तसेच, अनुदानात मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असेही देशमुख यांनी सांगितले. तर नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांनी बारामतीच्या विकासाला अधिक गती या दर्जावाढीमुळे मिळेल, असे सांगितले.

Web Title: The path of 'Amrut Yojana' is open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.