पठ्ठे बापूरावांचे वस्तुनिष्ठ चरित्रलेखन आवश्यक, मान्यवरांची अपेक्षा'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 01:51 AM2019-03-17T01:51:22+5:302019-03-17T01:51:33+5:30

शाहीर पठ्ठे बापूराव हे क्रांतदर्शी कवी होते. त्यांनी आयुष्यात संत तुकारामांसारखा लढा दिला. मात्र त्यांचे जीवन वास्तवापेक्षा अदभुत वलयाची मांडणी करून समोर आणले आहे.

Pathhe Bapoorav news | पठ्ठे बापूरावांचे वस्तुनिष्ठ चरित्रलेखन आवश्यक, मान्यवरांची अपेक्षा'

पठ्ठे बापूरावांचे वस्तुनिष्ठ चरित्रलेखन आवश्यक, मान्यवरांची अपेक्षा'

Next

पुणे - शाहीर पठ्ठे बापूराव हे क्रांतदर्शी कवी होते. त्यांनी आयुष्यात संत तुकारामांसारखा लढा दिला. मात्र त्यांचे जीवन वास्तवापेक्षा अदभुत वलयाची मांडणी करून समोर आणले आहे. शाहीर पठ्ठे बापूराव यांचे वस्तुनिष्ठ चरित्र लिहिले गेले पाहिजे अशी अपेक्षा ‘पठ्ठे बापूराव व्यक्ती आणि वाङमय’ याविषयावर आयोजित चर्चासत्रात मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली.
राज्य शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई विद्यापीठाची लोककला अकादमी यांच्या वतीने तसेच ललित कला केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विशेष सहकार्याने शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लोककलांचे अभ्यासक आणि मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमर शेख अध्यासनाचे समन्वयक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे, लोकसाहित्याचे अभ्यासक प्रभाकर होवाळ, सोपान खुडे यांनी सहभाग घेतला. या वेळी राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे मिलिंद लेले आणि ललित कला केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. प्रवीण भोळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी भूषविले.
सोपानराव खुडे यांनी शाहीर पठ्ठे बापूराव यांचा १८६६ ते १९४५ चा कालखंड उलगडला. ते म्हणाले, समकालीन तमाशा कालावंतांबरोबर शाहीर पठ्ठे बापूराव यांचे मतभेद झाले. समकालीन लोकांवर त्यांनी लावणी / गवळण लिहिली. एक गण रचून कलगी पक्षाचा उल्लेख चांगला पण तुरे याचा वाईट अशा प्रकारचे लेखन त्यांनी केले होते. या गणातून समकालीन तमाशा कलावंतांची नावे कळतात ही त्या लेखनाची जमेची बाजू आहे. आजच्या काळात पठ्ठे बापूरावांचे साहित्य संकलित करण्याची गरज आहे. प्रभाकर होवाळ म्हणाले, शाहीर पठ्ठे बापूराव हे नाव सांस्कृतिक क्षेत्रात अजरामर आहे. तमाशाची मशाल त्यांनी सर्वत्र पेटविली. त्यांची सांस्कृतिक उंची मोठी आहे. पण त्यांना उपेक्षित ठेवले. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे स्वछंदी होते. आज लिहिलेली लावणी आणि मिळालेला पैसा आजच खर्च करायचा असा त्यांचा स्वभाव होता. तमाशा कलावंत त्यांच्या नावाचा जागर करतात. त्यांच्यासारखा शाहीर महाराष्ट्रात दुसरा होणे नाही.
डॉ. प्रकाश खांडगे म्हणाले पठ्ठे बापूराव हे क्रांतदर्शी कवी होते. त्यांनी तुकोबासारखा लढा दिला. तुकाराम, पठ्ठे बापूराव व नामदेव ढसाळ यांच्यात समानसूत्र दिसते त्यांनी त्यांचे आत्मकथन काव्यातून मांडले. मी व्युत्पन्न ब्राह्मण घरातले अग्निहोत्र सोडले. वेशीबाहेर गेलो. अस्पृश्यांबरोबर राहिलो, त्यांच्या जगण्याला अर्थ दिला. माझ्या जगण्याला अर्थ मिळाला आणि मी शेवटी अर्थहीन झालो असे ते म्हणायचे. काळ कुठलाही असो काळाच्या कसोटीवर संत, पंत टिकतात आणि त्यांचे वाङ्मय अक्षर होते, त्यातले चिंतन त्रिकालाबाधित आणि सर्वसमावेश असते. लोककलावंतांना त्यांच्या गवळणी पाठ आहेत पण अर्थ माहिती नाही. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे.

पुणेकरांना लावले
९ सारखा पाढा शोधण्याचे वेड
तमाशातील कलगी-तुरा सामन्यात तुरेवाल्यांना कलगी पक्षाकडून शाहीर पठ्ठे बापूरावांनी ९ सारखा पाढा कोणता? असे विचारले. त्यासाठी २४ तास दिले. त्या वेळी पुण्यातले सगळे जण पाढा करायला बसले होते. कुणालाच जमले नाही. मग दुसऱ्या दिवशी उत्तर ऐकण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. तमाशा कलावंत दगडू साळी समोर बसले होते. ते उभे राहून म्हणाले मला येतय उत्तर! ९0 चा पाढा आहे. त्याची बेरीज केली तरी ९ च येते आणि उत्तर सापडले. असा किस्सा सोपान खुडे यांनी सांगितला.

अध्यक्षीय भाषणात विश्वनाथ शिंदे म्हणाले, पठ्ठे बापूराव यांचे चरित्र निर्माण होणे गरजेचे आहे. त्यांच्या जीवनाकडे पाहत असताना त्यांचे वास्तव जीवन सांगण्यापेक्षा त्यांच्याभोवती अदभुत वलय निर्माण करून लेखनाची मांडणी केली आहे. त्यांचे वस्तुनिष्ठ चरित्र लिहिले जायला हवे. चर्चासत्रानंतर ‘पंचरंगी पठ्ठे बापूराव’ हा विशेष कार्यक्रम पार पडला.

Web Title: Pathhe Bapoorav news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.