काँग्रेसच्या जिल्हा भवनांमध्ये सुरू होणार रुग्ण सहायता कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:09 AM2021-04-14T04:09:50+5:302021-04-14T04:09:50+5:30
प्रदेशाध्यक्षांची सूचना : पुण्यात नुसत्या बैठकाच; सुरुवात नाही लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रत्येक ...
प्रदेशाध्यक्षांची सूचना : पुण्यात नुसत्या बैठकाच; सुरुवात नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रत्येक जिल्हा शाखेत कोरोना रुग्ण सहायता कक्ष सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. २४ तास सुरू असणारी हेल्पलाईन व तिथे कायम उपस्थित कार्यकर्ते अशी व्यवस्था त्वरित करण्याच्या सूचना पटोले यांनी केल्या आहेत.
कोरोना रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांना या कक्षातून थेट आर्थिक मदत वगळता आवश्यक ते सर्व साह्य केले जाईल. त्यात रुग्णवाहिका मिळवून देणे, डॉक्टर उपलब्ध करून देणे, बेड वगैरेची माहिती तसेच सरकारी योजनांची सर्व माहिती प्रत्यक्ष वा फोनवरून दिली जाईल. कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांचे ऐनवेळी मदत मिळवण्यासाठी होणारे हाल लक्षात घेऊन पटोले यांनी प्रत्येक जिल्हा शाखेला असा कक्ष त्वरित सुरू करण्याबाबत सांगितले आहे.
महापालिका क्षेत्रात तेथील काँग्रेसने तातडीने कक्ष सुरू करावा, असेही कळवण्यात आले आहे.
पुणे शहर काँग्रेसमध्ये यासाठी अद्याप काहीही हालचाल दिसत नाही. जिल्ह्यासाठी व शहरासाठी असा कक्ष अद्याप तरी सुरू झालेला नाही. पटोले यांनी कळवून बरेच दिवस झाल्यानंतरही या स्तरावर अजून शांतताच आहे. पुणे शहरातील कोरोना स्थितीबाबत देशभरात चर्चा होत आहे. शहरात खाटा शिल्लक नाही, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळत नाहीत. तपासणीनंतर रोज ५ हजारच्या पुढे कोरोनाबाधित आढळत आहेत. त्यामुळेच पुण्यात असा कक्ष त्वरित सुरू करण्याची गरज असूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही.