Pune: डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; अडीच वर्षांनंतर डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 08:29 PM2023-11-30T20:29:10+5:302023-11-30T20:29:21+5:30
अखेर अडीच वर्षांनंतर तज्ज्ञांनी त्यांच्या अभिप्रायात मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा निष्कर्ष काढल्याने संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
आळेफाटा (पुणे) : येथील एका कॅन्सर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर नाकातोंडातून सातत्याने झालेल्या रक्तस्त्रावामुळे रुग्णाचा मृत्यू झाला. त्याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद आळेफाटा पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणी मृताच्या पुतणीने संबंधित डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चुलत्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केल्याने, पोलिसांनी याबाबत तज्ज्ञांशी पत्रव्यवहार केला. अखेर अडीच वर्षांनंतर तज्ज्ञांनी त्यांच्या अभिप्रायात मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा निष्कर्ष काढल्याने संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, ठकसेन ऊर्फ बाळासाहेब विठ्ठल चव्हाण (वय ४० रा. पादिरवाडी, वडगाव आनंद, ता. जुन्नर) यांच्या डाव्या गालावर गाठ आल्याने ते आळेफाटा येथील डॉ. अमोल अविनाश डुंबरे यांच्या सी क्युअर कॅन्सर हॉस्पिटल येथे तपासणीसाठी गेले होते. डॉक्टर डुंबरे यांनी त्या गाठीचे कॅन्सरची गाठ असल्याचे निदान करून त्यांना २७ फेब्रुवारी २०२१ रोजी शस्त्रक्रिया करण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार चव्हाण सकाळी ११ वाजता रुग्णालयात दाखल झाले व सायंकाळी ७ वाजता त्यांच्या डाव्या गालावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी कल्पना होती. त्यांच्या नाकातोंडातून सातत्याने रक्त येत असल्याने त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू होते. १ मार्च २०२१ रोजी सकाळी ११ च्या सुमारास जास्त रक्तस्त्राव होत असल्याने त्यांच्यावर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच दुपारी १:१० वाजता त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी बाळासाहेब चव्हाण यांनी पुतणी सहायक पोलिस निरीक्षक निशा महादेव चव्हाण यांनी चुलत्यांचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याबाबतची तक्रार १ मार्च २०२१ रोजी आळेफाटा पोलिस ठाण्यात दिल्याने सीआरपीसी १७४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या मृत्यूच्या कारणाबाबत संशय असल्याने, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूच्या तपासात ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील तज्ज्ञांच्या समितीकडे पत्रव्यवहार केला होता. तज्ज्ञांच्या समितीने अवलोकन करून ठकसेन ऊर्फ बाळासाहेब विठ्ठल चव्हाण यांचा मृत्यू सी क्यूअर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता भरती असताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा अभिप्राय दिल्याने, निशा चव्हाण यांनी डॉ. अमोल डुंबरे यांच्याविरुद्ध आळेफाटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्यावर भादंवि कलम ३०४ अ (निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत) नुसार गुन्हा दाखल केला आहे. आळेफाटा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर पुढील तपास करत आहेत.