ससूनमध्ये रुग्णसेवा ‘नको रे बाबा’! ललित पाटील प्रकरणामुळे धास्तावले प्रामाणिक डाॅक्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 10:37 AM2023-10-16T10:37:42+5:302023-10-16T10:39:45+5:30
ससूनमधील डाॅक्टरांवर त्यांच्या घरच्यांकडून देखील नाेकरीऐवजी खासगी प्रॅक्टिस करण्याचा सल्ला
पुणे : ‘आम्ही रात्रंदिवस अभ्यास केला व डाॅक्टर झालाे. शिक्षण घेतानाही आम्ही रुग्णसेवेचे धडे गिरवले आणि ससून रुग्णालयात गाेरगरिबांची सेवा करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे; परंतु सध्या ससून रुग्णालयात जे काही सुरू आहे त्यावरून येथे रुग्णसेवेपेक्षा इतर त्रास हाेण्याची शक्यता वाटते. म्हणून खासगी रुग्णालयात जाऊन काम केलेले परवडले, अशा भावना ससून रुग्णालयात प्रामाणिकपणे काम करणारे डाॅक्टर व्यक्त करत आहेत.
ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कैद्याकडून ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले आणि तेव्हापासून ससून रुग्णालय उलटसुलट प्रतिक्रियांमुळे प्रकाशझाेतात आले आहे; पण याचा परिणाम असाही झाला आहे की, यामध्ये सर्वसामान्यांवर प्रामाणिकपणे उपचार करणारे डाॅक्टरदेखील धास्तावले आहेत, तसेच कैद्यांवर उपचार करणारे डाॅक्टरसुद्धा चिंतेत आहेत. कळत-नकळत कैद्यांवर उपचार करणारे डाॅक्टर चाैकशीचा ससेमिरा मागे लागू नये यासाठी त्यांना काळजी वाटू लागली आहे.
ससून रुग्णालय हे सरकारी रुग्णालय आहे. त्यामुळे, येथे सर्वसामान्य रुग्णांवर उपचार केले जातात. तसेच, भांडण, अपघात यामधील रुग्ण जसे घेतले जातात तसेच, येरवडा येथील कैदी रुग्णांवरही उपचार केले जातात. त्यामुळे असा कैदी दाखल झाला तर त्यावर या डाॅक्टरांना उपचार करावे लागतात. पण, जेव्हा ललित पाटीलसारखे एखादे प्रकरण घडते, तेव्हा या उपचार करणाऱ्या डाॅक्टरांवर विनाकारण चाैकशीचा ससेमिरा लागताे. त्यामुळे, सध्या कैद्यांवर उपचार करणारे, तसेच न करणारेसुद्धा डाॅक्टर धास्तावतात.
कुटुंबीयही सांगतात, ससून साेडा, प्रॅक्टिस सुरू करा!
अशा प्रकरणामुळे ससूनमधील डाॅक्टरांवर त्यांच्या घरच्यांकडूनदेखील नाेकरीऐवजी खासगी प्रॅक्टिस करण्याचा सल्ला आणि तसा दबावदेखील वाढत असल्याचेही काही डाॅक्टर खासगीत सांगतात. अशा प्रकरणात नाव येईल आणि त्यामुळे समाजात असलेल्या इज्जतीलाही धक्का लागू नये, यामुळेही हे डाॅक्टर सध्या ससूनमध्ये काम करायचे की नाही या विचारात आहेत. अशा वेळी या डाॅक्टरांमध्ये ससूनच्या प्रशासनाने त्यांना काही हाेणार नाही असा विश्वास देणेदेखील गरजेचे आहे. अन्यथा अशा डाॅक्टरांना ससूनला गमवावे लागण्याचा धाेका नाकारता येत नाही.