रुग्णांची होतेय हेळसांड
By admin | Published: October 12, 2016 02:20 AM2016-10-12T02:20:22+5:302016-10-12T02:20:22+5:30
कोंढवा खुर्द येथील महापालिकेचे स्व. मीनाताई ठाकरे प्रसूती आणि रुग्णालयात दैनंदिन रुग्णांची संख्या जास्त आणि डॉक्टर कमी असल्याने रुग्णांची
कोंढवा : कोंढवा खुर्द येथील महापालिकेचे स्व. मीनाताई ठाकरे प्रसूती आणि रुग्णालयात दैनंदिन रुग्णांची संख्या जास्त आणि डॉक्टर कमी असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ते इतर ठिकाणी खर्च करून उपचार घेऊ शकतात; मात्र सर्वसामान्य रुग्णांचे मात्र हाल होत आहेत.
कोंढवा बुद्रुक, कोंढवा खुर्द आणि येवलेवाडी भागातील हॉस्पिटल मुख्य रस्त्यावर आणि मध्यवर्ती सोयीच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने येथे दरदिवसाला रुग्णांची संख्या ३०० ते ३५० पर्यंत असते. गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक, अल्पवयीन बालक यांची संख्या जास्त असून, त्यांच्यावर येथे मोफत उपचार केला जातो. तर, काहींना केवळ १० रुपये केसपेपर असल्याने सर्व सामान्य मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या प्रमाणात येथे उपचार घेत असतात.
परिसरात ठिकठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे आणि घाणीमुळे डास मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्याचा प्रादुर्भाव होऊन अनेक नागरिकांना सर्दी, ताप, थंडी, अंग व गुडघेदुखीचा त्रास होत आहे. चिकुनगुनिया आणि डेंगी आजाराचे अनेक रुग्ण येथे आढळत आहेत. त्यांना खासगी दवाखान्याकडे जावे लागते. तेथील खर्च पेलवत नसल्याने बिलासाठी सर्वसामान्य नागरिक विशेषत: विधवा महिला डोनेशन देणाऱ्या सामाजिक संस्थेकडे धाव घेत आहेत. दिवसाला पाच तरी रुग्णांचे गरीब नातेवाईक आर्थिक मदतीसाठी येतात. त्यांना शक्य तितकी आर्थिक मदत करत असल्याची माहिती मुस्लिम फाऊंडेशन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आजी गफूर पठाण यांनी दिली.
सध्या चिकुनगुनिया आणि डेंगी सदृश्य रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याने कायमस्वरूपी डॉक्टरांची संख्या वाढविण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.