'जम्बो'मध्ये साजरा झाला रुग्णाचा वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:12 AM2021-05-20T04:12:04+5:302021-05-20T04:12:04+5:30
पुणे : जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून बुधवारी अशाच एका रुग्णाचा वाढदिवस साजरा ...
पुणे : जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून बुधवारी अशाच एका रुग्णाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अनपेक्षितपणे रुग्णालयातील डॉक्टरांनी केक आणून सुखद धक्का दिल्याने रुग्णही भारावून गेला.
विवेक खरात असे या रुग्णाचे नाव आहे. खरात यांचा बुधवारी वाढदिवस होता. ते काही दिवसांपूर्वीच जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचारांकरिता दाखल झाले आहेत. त्यांचा वाढदिवस असल्याचे समजल्यानंतर डॉक्टर शांती चौधरी, डॉ. नम्रता घुशार, डॉ. हर्षल शिंदे, डॉ. नेहा अगरवाल, डॉ. धनश्री यांनी खरात यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले. त्यांनी खरात यांच्यासाठी केक मागविला. पीपीई किटमधील सर्व डॉक्टर त्यांना बोलवायला गेले. खरात यांना काहीच माहिती नसल्याने ते थोडे घाबरले. परंतु, वाढदिवसाचा केक पाहिल्यावर त्यांना सुखद धक्का बसला.
सर्वांनी मिळून त्यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला. कोविड केअर सेंटरमध्ये अशा प्रकारचा अनुभव येईल असे वाटले नव्हते, अशी भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली.
-----
रुग्ण उपचारांसाठी येतात तेव्हा ते घाबरलेले असतात. अशा वेळी त्यांचे मनोबल वाढविणे आणि त्यांना सकारात्मक प्रतिसाद देणे आवश्यक असते. बुधवारी कोरोना रुग्णाचा वाढदिवस साजरा करून जम्बोमधील वैद्यकीय सेवकांनी एक सकारात्मक वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला आहे.
- रुबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका
----
एप्रिल महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना जम्बोमध्ये ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी उत्तम काम केले आहे, अशा सर्वांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामुळे त्यांनाही कामाची प्रेरणा मिळणार असून त्यांचा उत्साह वाढणार आहे. मे महिन्यात देखील उत्तम काम करणाऱ्यांचा सत्कार केला जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले.