ऑक्सिजन संपत आल्याने रुग्णांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:12 AM2021-04-21T04:12:23+5:302021-04-21T04:12:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील अनेक रुग्णालयांमधील ऑक्सिजन संपला असून, बुधवारी दुपारपर्यंत ऑक्सिजन पुरवठा न झाल्यास यापैकी बहुतांशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील अनेक रुग्णालयांमधील ऑक्सिजन संपला असून, बुधवारी दुपारपर्यंत ऑक्सिजन पुरवठा न झाल्यास यापैकी बहुतांशी रुग्णालयांमधील ऑक्सिजन, व्हेंटिलेटरवरील रुग्णांना अन्यत्र हलविण्याची गंभीर परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे़ त्यामुळे पुण्यातील रुग्णालयांतील स्थिती गंभीर होणार आहे.
शहरातील मांजरी भागातील एका रुग्णालयामधील ऑक्सिजन संपल्यामुळे येथे रुग्णांना प्राण गमविण्याची घटनाही शहरात घडली आहे़ त्यातच महापालिकेकडे शहरातील तीन खासगी रुग्णालयांनी दुपारपासूनच ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी केली़ मात्र महापालिकेकडे सध्या महापालिकेच्याच रुग्णालयांना बुधवारी (दि. २१) दुपारपर्यंत पुरेल एवढीच उपलब्धता असल्याचे चित्र आहे़ तरीही पुणे महापालिकेने आज दोन खासगी रुगणालयांना ऑक्सिजनचे जम्बो सिलिंडर पुरविले आहेत़ परंतु, सध्या महापालिकेकडे केवळ ५ जम्बो सिलिंडर शिल्लक आहेत. दरम्यान, महापालिकेच्या नायडू, बाणेर येथील ऑक्सिजन प्लांटमध्ये ऑक्सिजन लिक्विड असल्याने, उद्या दुपारपर्यंत महापालिकेच्या सर्व रुग्णालयांची ऑक्सिजनची गरज भासू शकत असली तरी, महापालिकेला तातडीने ऑक्सिजन लिक्विडची गरज आहे़
शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये अनेक ठिकाणी ऑक्सिजन बेडला ऑक्सिजन पुरवठा हा जम्बो अऑक्सिजन सिलिंडरव्दारेच पुरवठा होत आहे़ पण, आज लहान रुग्णालयांमध्ये या जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता निर्माण झाल्याने शहरातील काही लहान रुग्णालयांमधील ऑक्सिजन व व्हेंटिलेटरवर उपचार घेणारे रुग्ण खबरदारीचा उपाय म्हणून अन्यत्र हलविण्यात आले आहे़
महापालिका रुग्णालयांना तथा शहरातील खासगी रुग्णालयांना तातडीने ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी महापालिका प्रशासनासह वरिष्ठ पदाधिकारी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत करीत होते़
---------------------------