औषधे मिळत नसल्याने रुग्णांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:11 AM2021-04-07T04:11:41+5:302021-04-07T04:11:41+5:30
पुणे : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तसेच सीसीसी सेंटरमध्ये औषधे न मिळाल्याने रूग्णांसह नातेवाईकांचे हाल होत आहेत. रूग्णास आवश्यक असणारी ...
पुणे : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तसेच सीसीसी सेंटरमध्ये औषधे न मिळाल्याने रूग्णांसह नातेवाईकांचे हाल होत आहेत. रूग्णास आवश्यक असणारी औषधे तसेच रेमडेसिविर इंजेक्शन हे रूग्णांच्या नातेवाईकांना अन्य मेडिकलमधून आणण्यास सांगितले जात आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना होणारा हा त्रास तत्काळ थांबविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना यांच्याकडून पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार सुरु आहे. रेमडेसिविर इंजेक्शन व इतर औषधे वेळेवर न मिळाल्याने व मिनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रूग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. बाणेर कोविड सेंटरमधील तरुण रुग्णाची रेमडेसिविर इंजेक्शन न मिळाल्याने जीव जायची वेळ आली होती. पालिकेने खासगी रूग्णालयातील ८० टक्के बेड ताब्यात घेण्याचे नुसतेच आदेश देण्यात आले. परंतू हे बेड प्रत्यक्षात ताब्यात आलेले नाहीत, असे डॅशबोर्डवरून दिसून येते आहे.
हे ८० टक्के ताब्यात आलेले बेड डॅशबोर्डवर का दिसत नाहीत याचा लेखी खुलासा मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. रुग्णांच्या उपचाराच्या खर्चाचे व पालिकेने पाठविलेल्या रुग्णांच्या खर्चाचे नियोजन कसे व कोण करत आहे याचा खुलासा करण्याची मागणी महाविकास आघाडी तर्फे विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ, काँग्रेस पक्ष नेते आबा बागुल, शिवसेना पक्षनेते पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे.