ससूनमध्ये रुग्णांचे हाल
By admin | Published: November 20, 2015 03:27 AM2015-11-20T03:27:19+5:302015-11-20T03:27:19+5:30
वेळ दुपारी १२... ससून रुग्णालयामध्ये पोटाच्या दुखण्यासाठी आलेला रुग्ण... उपचारासाठी डॉक्टरांना भेटण्यापेक्षा विविध कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी करावी लागणारी वणवण...
पुणे : वेळ दुपारी १२... ससून रुग्णालयामध्ये पोटाच्या दुखण्यासाठी आलेला रुग्ण... उपचारासाठी डॉक्टरांना भेटण्यापेक्षा विविध कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी करावी लागणारी वणवण... त्यामुळे मूळ दुखणे बाजूला राहून औपचारिकता पूर्ण करण्यातच गेलेला वेळ... इतके करूनही उपचार न मिळताच रुग्णाला रिकाम्या हाती परत जावे लागते. अशा प्रकारे शासकीय रुग्णालयात रुग्णाची होणारी ससेहोलपट नित्याचीच बाब झाली आहे. ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये रुग्णांना होणारा मनस्ताप आणि कागदी घोडे नाचविणाऱ्या कर्मचाऱ्यांची असंवेदनशीलताही समोर आली आहे.
पोट दुखत असल्याने एक वृद्ध रुग्ण उपचारांसाठी ससूनमध्ये आला होता. चौकशी खिडकीवर चौकशी केल्यावर केसपेपर करावा लागेल, असे सांगितल्याने ते वयस्कर रुग्ण व त्याच्यासोबत आलेले नातेवाईक केसपेपरच्या रांगेत उभे राहिले. नंबर आला तेव्हा ‘१२ वाजले असून आता केसपेपर मिळणार नाही,’ असे त्यांना सांगण्यात आले. मात्र, त्रास होत असल्याचे सांगितल्यानंतर रुग्णाला बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) डॉक्टरांना दाखवा, असे सांगण्यात आले. तेथील डॉक्टरांनी दुसऱ्या ठिकाणी जायला सांगितले. तिथे रुग्णाची साधारण तपासणी करण्यात आली.
आरोग्याच्या विविध तक्रारींसाठी आलेले रुग्ण, त्यांच्या भल्या मोठ्या रांगा आणि त्यातूनच वाट काढत आपली कागदपत्रे जमविण्यासाठी रुग्णांची चालू असलेली धडपड, डॉक्टरांचे रुग्णांकडे होणारे दुर्लक्ष हे शासकीय आरोग्यसेवेचे खरे रूप बहुतांशी सरकारी रुग्णालयांमध्ये पाहायला मिळत आहे.
रुग्णाची आधी अल्सरची शस्त्रक्रिया झालेली होती. टाके असलेल्या ठिकाणी पोट दुखत असल्याने सोनोग्राफी करावी लागेल, असे संबंधित डॉक्टरांनी सांगितले. रुग्ण तातडीने सोनोग्राफी करण्याची जागा शोधून तेथे गेला. मात्र, सोनोग्राफीसाठी रुग्णांची प्रतीक्षायादी असून तुम्हाला १० डिसेंबरला यावे लागेल, असे तेथील कर्मचाऱ्यांनी सुनावले. वेदनेने रुग्णाचा जीव काकुळतीला आलेला असताना त्याचे गांभीर्य ना डॉक्टरांना ना तेथील सोनोग्राफी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिसून आले.
नाइलाजास्तव रुग्ण पुन्हा डॉक्टरांना दाखवायला आल्यावर आता थेट १० तारखेला या, असे त्यांनी सांगितल्यावर रुग्ण आणि त्याचे नातेवाईक संभ्रमात पडले. पोट दुखत असताना १० तारखेपर्यंत ‘नेमके काय करायचे’ हे रुग्णाने विचारल्यावर रजिस्ट्रेशन नंबर आणा मग वेदनाशमक औषधे लिहून देतो असे संबंधित डॉक्टरांनी रुग्णाचा त्रास गांभीर्याने न घेता सांगितले. औषधे लिहून देण्यासाठीही एक क्रमांक लिहून आणावा लागेल असे सांगितल्यावर मात्र रुग्णाच्या अंगातील त्राणच गेले. १२ वाजल्यापासून एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी फिरणारा आणि रांगेत थांबून-थांबून वैतागलेला रुग्ण दुसरा कोणताही पर्याय नसल्याने हा क्रमांक आणण्यासाठी पुन्हा एका रांगेत उभा राहिला.
पुन्हा हा क्रमांक घेऊन डॉक्टरांकडे गेल्यावर तिथे असणाऱ्या गर्दीमुळे रुग्णाला पुन्हा ताटकळत बसावे लागले. बऱ्याच वेळाने औषधांची यादी डॉक्टरांनी दिली आणि पोटदुखीवर केवळ वेदनाशामके देऊन वेळ मारून नेली. फिरून फिरून दमल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठीही रुग्णाला रुग्णालयात फिरावे लागले. साधी पिण्याच्या पाण्याची एकही पाटी नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची चांगलीच तारांबळ उडाली. सरतेशेवटी उपचाराशिवायच रुग्णाला घरचा रस्ता धरावा लागला. हे ससूनमधील विदारक आणि वास्तवदायी चित्र दररोज पाहायला मिळत आहे. मात्र, रुग्णांच्या त्रासाकडे डॉक्टरांना, कर्मचाऱ्यांना आणि प्रशासनाला पाहायला वेळच नसल्याचे चित्र आहे.
रुग्णाच्या जिवावर बेतल्यास जबाबदार कोण?
ससूनमधील सर्व वॉर्ड एकमेकांपासून काही अंतरावर असल्याने रुग्णाची होत असणारी पळापळ आणि शेवटी हाती काहीच न लागल्याने रुग्णाला कोणतेही निदान न होता घरी जावे लागणे, असे अनुभव ससूनमध्ये येणाऱ्या अनेक रुग्णांना येत आहेत. वेदनेने त्रासलेल्या रुग्णांना असे पाठविल्यानंतर ते त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातकही ठरू शकते. हा निष्काळजीपणा रुग्णाच्या जिवावर बेतल्यास त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न निर्माण होत आहे.