डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांमध्ये रुग्णांचा द्यावा हलका आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:20 AM2021-09-02T04:20:35+5:302021-09-02T04:20:35+5:30
पुणे : सध्या छोट्या दवाखान्यापासून मोठ्या रुग्णालयापर्यंत सर्वत्र व्हायरल इन्फेक्शन झालेल्या रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे. बदलत्या हवामानामुळे डेंग्यू, ...
पुणे : सध्या छोट्या दवाखान्यापासून मोठ्या रुग्णालयापर्यंत सर्वत्र व्हायरल इन्फेक्शन झालेल्या रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे. बदलत्या हवामानामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियासह फ्लूच्या आजारानेही आबालवृद्धांमध्ये डोके वर काढले आहे. आजारातून बरे होण्यासाठी औषधोपचारांइतकेच योग्य आहारालाही महत्त्व असते. त्यामुळे विषाणूजन्य, संसर्गजन्य आजारांमध्ये रुग्णांना हलका आहार द्यावा आणि द्रव पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करावा, असे आवाहन आहारतज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.
पावसाळ्यात दूषित अन्न आणि पाण्यामुळे विविध संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यात प्रामुख्याने डेंग्यू, मलेरिया, टायफाॅईड आणि चिकुनगुनिया रुग्णांची संख्या अधिक दिसून येत आहे. अनलॉक झाल्यावर रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि जंक फूड सेवनाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे विविध आजारांना आमंत्रण मिळत आहे. या आजारांमध्ये ताप, अतिसार, उलट्या, मळमळ, भूक कमी होणे, पोटदुखी अशी लक्षणे दिसून येतात.
आहारतज्ज्ञ कस्तुरी भोसले म्हणाल्या, डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांमध्ये ताप येतो, अन्नावरची वासना उडते. उलट्या, मळमळ अशी लक्षणेही दिसतात. या काळात रुग्णांना दिला जाणारा आहार पचायला हलका असावा. फळांचा आहारात समावेश केल्याने ताकद मिळते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाणही राखले जाते. भाताची पेज, मूग डाळीची खिचडी, कढण, सूप अशा पदार्थांचा समावेश करावा. या पदार्थांनी तोंडाला चव येते आणि भूक वाढण्यासही मदत होते. तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ टाळावेत.
------------------
मलेरियाच्या रुग्णांमध्ये थंडी वाजणे, पोटदुखी, जुलाब होणे अशी लक्षणे दिसतात. अशा वेळी सफरचंद वाफवून देता येतात. संत्री, मोसंबी, डाळिंबाचा रस दिल्यास अन्नावरची वासना परत येण्यास मदत होते. सध्याच्या हवामानात केळे कफकारक मानले जाते. त्यामुळे डॉक्टरही शक्यतो आजारपणात केळे टाळण्याचा सल्ला देतात. आजारपणात एखादा कप चहा घेण्यास हरकत नाही. कॉफीमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, तसेच पोषकतत्वेही शोषली जातात.
- डॉ. कस्तुरी भोसले, आहारतज्ज्ञ
-----------------------
डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांच्या आहारात शहाळ्याचे पाणी, संत्री, मोसंबी, हिरव्या पालेभाज्या अशा पदार्थांचे सेवन करावे. आजारांमध्ये बी-१२, डी ३ अशा जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण झालेली असते. फळांमधून, भाज्यांमधून ही कमतरता भरून निघते. पालक, गाजर, तांबडा भोपळा यांचे सूपही देता येईल.
- डॉ. निशांत चावरे, जनरल फिजिशियन