रुग्णालयात रुग्णांना मिळेनात खाटा, वशिलाही कामी येईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:09 AM2021-03-30T04:09:07+5:302021-03-30T04:09:07+5:30
पुणे : शहरात ३३ हजारांपर्यंत पोहोचलेली सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या व दररोज यात सुमारे तीन हजारांनी होणारी वाढ, यामुळे शहरातील ...
पुणे : शहरात ३३ हजारांपर्यंत पोहोचलेली सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या व दररोज यात सुमारे तीन हजारांनी होणारी वाढ, यामुळे शहरातील सर्व रुग्णालयांमधील कोरोनाबाधितांसाठी राखीव खाटा पूर्ण क्षमतेने भरल्या आहेत़ यामुळे आजमितीला, ना लोकप्रतिनिधींचा-ना अधिकाऱ्यांचा वशिला कामी येईना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़ परिणामी योग्य खबरदारी घेणे, मास्कचा वापर करणे व विनाकारण फिरणे टाळून गर्दीच्या ठिकाणी न जाणे हाच आता कोरोनावर मात करण्याचा पर्याय उरला आहे़
कोरोनाबाधितांची नित्याची वाढती संख्या ही प्रशासनासह लोकप्रतिनिधींनाही चिंतेची बाब ठरली आहे़ घरात एखाद्या व्यक्तीचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर लागलीच संबंधिताचे नातेवाईक अमुक-एक नगरसेवकास फोन करतात़,तर काही जण थेट आपला वशिला महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आहे असे सांगून रुग्णालयात बेड मिळविण्याचाही प्रयत्न करताना दिसत आहेत़ परंतु, रुग्णालयांमधील खाटांची मर्यादित क्षमता व दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वाढणारे रुग्ण यामुळे सर्वच जण रुग्णालयांमध्ये खाटा मिळवून देण्यास हतबल झाले आहेत़
नगरसेवकांना आपल्या वाॅर्डातील कार्यकर्त्यांला किंबहुना नागरिकांना याबाबतीत नाही म्हणता येत नाही़ याकरिता ते सर्वतोपरी प्रयत्न करतातही़ पण काहींना बेड मिळत असून, तर काळाने आज अनेकांना निराशेला सामोरे जाण्यास भाग पाडले आहे़ दुसरीकडे अधिकाऱ्यांचीही हीच अवस्था असून, शहरातील आजी-माजी नगरसेवक, अन्य लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे नातेवाईक असे असंख्य फोन व मोबाईल प्रत्येकाच्या दालनात सारखेच खणाणत आहेत़ आम्हाला बेड हवा आहे, काही करा पण एक बेड द्या, याशिवाय सध्या कुठलेच वाक्य या संभाषणात दिसून येत नाही़ पण मर्यादित बेडसंख्येमुळे केवळ पाहतो, बेड मिळाला की कळवितो याशिवाय कुठलेच उत्तर देणे आता कोणालाही देता येत नाही़
शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या, त्यातच शहराबाहेरील म्हणजे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनाबाधित व अन्य जिल्ह्यातून येणारे रुग्ण यामुळे शहरात सध्या बेड मिळणे मोठे जिकिरीचे झाले आहे़ यामुळे मी जबाबदार यानुसार प्रत्येकाने स्वत:हून खबरदारी घेणे व बेडसाठी कोणाला वशिला लावण्याची वेळ आणू नये हेच महत्त्वाचे ठरणार आहे़
----------------------------