विरोधकांना उत्तर देण्यासाठीच पतिराजाला उचलून केला विजयोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:13 AM2021-01-20T04:13:32+5:302021-01-20T04:13:32+5:30
पाईट : पतीविरुद्ध अफवा पसरविणाऱ्यांना चोख उत्तर देण्यासाठीच पतीला खांद्यावर उचलून घेतले, अशी भावना पाळू येथील रेणुका संतोष गुरव ...
पाईट : पतीविरुद्ध अफवा पसरविणाऱ्यांना चोख उत्तर देण्यासाठीच पतीला खांद्यावर उचलून घेतले, अशी भावना पाळू येथील रेणुका संतोष गुरव यांनी व्यक्त केली. विजयी झालेल्या पतिराजाची खांद्यावर घेऊन मिरवणूक काढल्यानंतर रेणुका गुरव संपूर्ण राज्यात प्रसिद्धीस आल्या आहेत.
‘लोकमत’शी बोलताना रेणुका चौधरी म्हणाल्या, निवडणुकीमध्ये माझे पती संतोष गुरव यांच्या विरोधात अनेक अफवा पसरवल्या. निवडणूक लढवण्याचे त्याचे काय काम आहे का? तो निवडून येणार आहे का? असे म्हणत लोकांमध्ये गैरसमज निर्माण केला. संतोष यांनी निवडून येत याला उत्तर दिले. त्यांना उचलून घेत विजयोत्सव साजरा करत मी विरोधकांना उत्तर दिले आहे. शेती व दूध व्यवसाय करुन संसार चालविणारे संतोष गुरव यांच्यासोबत प्रत्येक कामात खांद्याला खांदा लाऊन रेणुका गुरव काम करतात.
घरी २० म्हशी. त्यांना चारापाणी करणे तसेच त्यांच्या धारा काढणे. दूध डेअरीमध्ये घेऊन जाणे असा साधा सरळ दिनक्रम असणाऱ्या कुटुंबात स्वतः संतोष, पत्नी रेणुका, सासूसासरे तसेच दोन मुले असं सर्व कुटुंबच दूध व्यवसायात गुंतले आहे. १३५ लिटर प्रतिदिन दूध काढण्यासाठी स्वतः काही म्हशींच्या धारा काढायच्या व पतीला मदत करण्याचा रेणुका यांचा दिनक्रम. मात्र, संतोष हे ग्रामपंचायत निवडणुकीत रिंगणात उतरल्याने निवडणुकीचे आडाखे सर्वसामान्यांच्या विचाराच्या पलीकडे असते हे त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना अनुभवायला आले.
प्रचारादरम्यान लोकांची होणारी कुजबूज कानावर यायची. संतोषला निवडणूक लढवायचे काय काम आहे का? त्याला त्याच्या घरच्यांचीच मते मिळणार नाही अशी अफवा पसरवायला लागले. यामुळे संतोष निवडून आल्यावर या अफवा पसरवणाऱ्यांना कसे उत्तर द्यायचे, याचा विचार करत असल्याचे रेणुका यांनी सांगितले. शेवटी निवडणुकीचा निकाल लागला. संतोष हे निवडून आल्याचे कळताच आनंद गगनात मावेनासा झाला आणि मी अनपेक्षितपणे त्यांना खांद्यावर घेतले. संतोष हे नको नको म्हणत होते. मात्र, तुम्ही थांबा हो म्हणत मी त्यांना उचलून घेत जल्लोष केल्याचे रेणुका गुरव यांनी सांगितले.
............................. .. ............................