पतीराजांची लुडबूड

By admin | Published: April 3, 2015 03:25 AM2015-04-03T03:25:37+5:302015-04-03T03:25:37+5:30

महापालिकेतील स्थायी समिती, विधी, क्रीडा, शिक्षण मंडळ आदी विभागांमध्ये नगरसेविका महिलांसह त्यांचे पतीराजही हजेरी लावतात.

Patirraj's interrogation | पतीराजांची लुडबूड

पतीराजांची लुडबूड

Next

पिंपरी : महापालिकेतील स्थायी समिती, विधी, क्रीडा, शिक्षण मंडळ आदी विभागांमध्ये नगरसेविका महिलांसह त्यांचे पतीराजही हजेरी लावतात. विविध समितींच्या होणाऱ्या बैठकीच्या कक्षाबाहेर असणाऱ्या अँटिचेंबरमध्ये पतीराज बसून कामकाजात लुडबूड करीत असतात.
स्थायीच्या बैठकीत कोट्यवधींच्या आर्थिक व्यवहारांचे विषय मंजुरीस येत असतात व मोठ्या प्रमाणावर चर्चा होते. कोणत्याही पदावर कार्यरत नसताना पत्नी व अधिकाऱ्यांच्या कक्षातही हे बहाद्दर कामात लुडबूड करताना दिसून येतात. पतीराजांकडे पद नसले, तरीही महापालिकेत आपले वर्चस्व आहे, हे सिद्ध करण्यासाठी या मंडळींची धडपड सुरू असते. असेच चित्र विविध समित्यांच्या कक्षांतही असते.
पदाधिकारी तसेच सत्ताधारी पक्षनेत्यांसमवेत अधिकारी कक्षातही त्यांचा वावर असतो. चहापानातही सहभागी असतात. पद नसतानाही महापालिकेत नियमितपणे उपस्थिती लावणे, समितीच्या कार्यालयात हजेरी लावणे, यामागचा त्यांचा हेतू काय? किंवा विविध समित्यांमध्ये होणाऱ्या पतीराजांच्या हस्तक्षेपावर महापालिका प्रशासनाचाही वचक नाही. महिला पदाधिकाऱ्यांच्या पतीराजांकडून होणाऱ्या हस्तक्षेपाबाबत सभापतींचे सभापती किंवा अन्य सदस्य अवाक्षरही काढत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे.
आकुर्डी गावठाण, पिंपळे गुरव, भाटनगर, चिंचवडगाव, स्टेशन, थेरगाव, वाकड, पिंपळे निलख, रहाटणी, पिंपळे सौदागर, किवळे, प्राधिकरण, तळवडे, चिखली, पिंपरी कॅम्प, भोसरी, दापोडी, कासारवाडी, काळेवाडी, नेहरूनगर या प्रभागातील नगरसेविकांच्या कारभारात पतीराजांची लुडबूड दिसून येत आहे. महापालिकेतील कामकाज, प्रश्नांना सामोरे कसे जावे, याची माहिती करून देण्यासाठी हे पतीराज लुडबूड करताना दिसून येतात. काही पतीराज तर नियमितपणेही महापालिकेत हजेरी लावताना दिसून येतात, तर काही नगरसेविकांचे पती महापालिकेत न येताही घरूनच महापालिकेतील कारभार चालवितात.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील एक माजी सदस्य पत्नीसमवेत नियमितपणे येतात. देहबोली आणि आविर्भावातून आपणच नगरसेवक असल्याचे ते भासवितात. भोसरी विधानभा मतदारसंघातील स्थायी समितीचे एक माजी सदस्य पत्नीसमवेत येऊन आपणच स्थायीचे सदस्य आहोत, हे भासविण्याचा प्रयत्न करतात. अशाच प्रकारे काही नगरसदस्य, तसेच शिक्षण मंडळ माजी सभापती, काही माजी विरोधी पक्षनेते, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, विविध समित्यांचे माजी सभापती, उपसभापती, सदस्य आपल्या पत्नीच्या कारभारात हस्तक्षेप करताना दिसून येतात.(प्रतिनिधी)

Web Title: Patirraj's interrogation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.