कॉंग्रेसमधील कुरबुरींवर पटोलेंचा मुंबईत येण्याचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:09 AM2021-07-10T04:09:25+5:302021-07-10T04:09:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “साहेब ८२ नगरसेवकांचे २९ झाले. त्याचेही नंतर ९ झाले. थोडे तरी लक्ष द्या!’ प्रवेशद्वाराच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “साहेब ८२ नगरसेवकांचे २९ झाले. त्याचेही नंतर ९ झाले. थोडे तरी लक्ष द्या!’ प्रवेशद्वाराच्या अगदी मध्यावर भरगर्दीत कानी पडलेल्या या तक्रारीची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दखल घेतली आणि ‘मुंबईत भेटा, करू काहीतरी’ असा शब्दही दिला.
अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष असताना कधीही काँग्रेस भवनात फिरकले नाहीत. पटोले मात्र शुक्रवारी (दि. ९) नागपूरातून काँग्रेस भवनमध्ये आले. त्यामुळेच एरवी ओस असलेले काँग्रेस भवन गर्दीने ओसंडून गेले होते. पत्रकार परिषद झाल्यावरही पटोले यांनी ‘आता सहज गप्पा’, असे म्हणत पत्रकारांबरोबर गप्पाष्टक छेडले.
त्यातही त्यांनी भाजपा का सोडला यावर गरमागरम भाष्य करत काँग्रेस पुन्हा स्वबळावर नक्की उभी राहील असा ठाम आत्मविश्वास व्यक्त केला. ‘स्वबळाचा आग्रह सोडलेला नाही, त्यावरून मला कोणीही बोललेले नाही,’ असेही मोकळेपणाने सांगितले.
“मी काँग्रेसमधूनच तिथे गेलो. पण तिथे गेल्यावर थोड्याच दिवसात भ्रमनिरास झाला. अनेकांचा तसाच होत आहे. येत्या काही दिवसांत काय करतो ते पहा,” असे म्हणत त्यांंनी ‘घरवापसी’चे संकेतही दिले. काँग्रेसमध्ये लवकर निर्णय होत नाहीत, हे खरे आहे, अशी कबूली त्यांनी दिली. पण येथे स्वायत्ता आहे, तिकडे नाही असे म्हणत देशात बदल नक्की होणार असे म्हणाले.
पटोलेंच्या या मोकळ्याढाकळ्या वागण्याने शहर काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते भारावले होते. त्यांच्यातीलच एकाने ते निघत असताना त्यांना दाराजवळ गाठले व शहर काँग्रेसची अवस्था बिकट झाल्याचे हलकेच कानात सांगितले. “या मुंबईत, नक्की पाहूयात,” असे म्हणत पटोले यांनी तेवढ्यातही तक्रारदाराचा चेहरा नीट पाहून घेतला. “आता मुंबईत नक्कीच जाणार आणि बोलणारही,” असे त्या पदाधिकाऱ्याने नंतर सांगितले.