देशभक्तीचा जागर

By admin | Published: October 2, 2015 12:52 AM2015-10-02T00:52:50+5:302015-10-02T00:52:50+5:30

गुड मॉर्निग, गुड नाइट, नमस्कार, आदाब असे अभिवादनपर शब्द न उच्चारता ‘जयहिंद’ म्हणा.

Patriot jagar | देशभक्तीचा जागर

देशभक्तीचा जागर

Next

पिंपरी : गुड मॉर्निग, गुड नाइट, नमस्कार, आदाब असे अभिवादनपर शब्द न उच्चारता ‘जयहिंद’ म्हणा. सर्व जाती-धर्माच्या नागरिकांमध्ये देशभक्ती वाढविण्यासाठी, प्रेम आणि विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी या पद्धतीने अभिवादन करावे, असे आवाहन निवृत्त भारतीय सैनिकांनी केले. देशसुरक्षेसाठी जवानांसोबत नागरिकांची जबाबदारी असल्याचे भान त्यांनी करून दिले.
‘शौर्या तुला वंदितो’ या देशभक्तीचा जागर कार्यक्रमात १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या ५० सैनिक आणि अधिकाऱ्यांचा हृद्य सत्कार सोहळ्यात निवृत्त जवानांनी नागरिकांना संदेश दिला. सह्याद्री प्रतिष्ठान, राष्ट्रीय सैनिक संस्था व मार्शल कॅडेट फोर्स च्या वतीने संत आचार्य अत्रे रंगमंदिरात मोठ्या उत्साहात कार्यक्रम झाला.
डोक्यावर केशरी रंगाचा फेटा, छातीवर लावलेली असंख्य लष्करी पदके, चेहऱ्यावर उल्हसित करणारे तेज ७२ ते ९६ वर्षांच्या या निवृत्त जवानांच्या चेहऱ्यावर झळकत होते. मार्शल कॅडेट फोर्सच्या विद्यार्थ्यांनी लष्करी शिस्तीत प्रत्येकाचे स्वागत केले. राजपुताना रायफल बॅँगपाईप बॅण्डपथकाच्या वादनात अमर जवान ज्योतीस मानवंदना दिल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते रौप्यपदक, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
मार्गदर्शन करताना वीरचक्रविजेते निवृत्त कर्नल तेजेंद्रपाल त्यागी म्हणाले, ‘‘कोणी भेटल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने अभिवादन केले जाते. ही पद्धत बदलून सर्वांनी अभिवादन करताना ‘जयहिंद’ म्हणावे. त्यामुळे देशभक्ती वाढीस लागेल. शहिदांचा सन्मान केला गेल्याने राष्ट्र निर्माणास चालना मिळणार आहे.’’ त्यागी, निवृत्त कॅप्टन जयंत सरंजामे आणि निवृत्त ब्रिगेडीअर दिवाकर परांजपे यांनी १९६५ च्या युद्धाची माहिती दिली. कोणत्या परिस्थितीत कामगिरी फत्ते केली याची जाणीव करून दिली.
उद्योगमंत्री देसाई म्हणाले, ‘‘पाकिस्तानसोबत तीन युद्धे झाली आहेत. त्यात त्यांना धडा शिकविला, तरीही त्याची वळवळ कायम आहे. या युद्धात मरण पावलेल्या सैनिकांच्या संख्येपेक्षा अधिक संख्येने छुप्या आणि अतिरेकी हल्ल्यात अधिक सैनिक मारले गेले आहेत. पाकिस्तानचे कंबरडेच मोडण्यासाठी सध्याचे भारतीय सैनिक सक्षम आहेत. पंतप्रधानांनी तशी परवानगी द्यावी. पलीकडील सीमेपर्यंत जाऊन सर्व प्रदेश काबीज करण्याची क्षमता सैनिकांमध्ये आहे. आता आरपारच्या युद्धाची गरज आहे.’’ लष्करामध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. ’’
या वेळी निवृत्त एअर कमांडर सुरेंद्र त्यागी, आमदार महेश लांडगे, नितीन बानगुडे, विकास काने, कैलास लबडे, नगरसेवक महेश चांदगुडे, सुजाता पलांडे आदी उपस्थित होते. ओमप्रकाश पेठे यांनी प्रास्ताविक केले. श्रमिक गोजमगुंडे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Patriot jagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.