पावणेदोनशे मंडळांची मिरवणूक रंगली शुक्रवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2016 01:25 AM2016-09-17T01:25:51+5:302016-09-17T01:25:51+5:30
डीजेचा वापर जास्त असल्याने बहुतांश मंडळांनी सायंकाळी मुख्य मिरवणुकीत सहभाग घेतल्याने टिळक रस्त्यावरील मिरवणूक रेंगाळली.
पुणे : डीजेचा वापर जास्त असल्याने बहुतांश मंडळांनी सायंकाळी मुख्य मिरवणुकीत सहभाग घेतल्याने टिळक रस्त्यावरील मिरवणूक रेंगाळली. गुरुवारी रात्री बारापर्यंत केवळ १५ मंडळांचे रथ टिळक रस्त्यावरून विसर्जनासाठी मार्गस्थ झाले. त्यानंतर तब्बल १८१ मंडळे शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंत सहभागी झाली. सकाळी नऊ वाजल्यानंतर पोलिसांनी मिरवणुका पुढे नेण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यामुळे विसर्जनाचा कालावधी कमी झाला.
टिळक रस्त्यावरील बहुतेक मंडळे डीजे व विद्युतरोषणाईची असल्याने या रस्त्यावरील मिरवणूक सुरू व्हायलाच दुपार उजाडली. घोरपडे पेठेतील कैकाडी समाज तरूण मंडळ दुपारी पाऊणच्या सुमारास स. प. महाविद्यालयाजवळ आला. त्यापाठोपाठ १.२५ वाजता पर्वती पायथा येथील आझाद मित्र मंडळाची दोन ढोलताशा पथके असलेली मिरवणूक आली. त्यानंंतर तब्बल अडीच तासांनी सार्वजनिक चिंचेची तालीम मंडळाच्या रथाचे आगमन झाले. त्यापाठोपाठ चार वाजता हत्ती गणपती मंडळाचा कमल रथ आला. शिवाजीमहाराजांचा अश्वारूढ हलता देखावा रथाच्या पुढे होता. त्यापुढे दोन ढोलताशा पथकांचे वादन सुरू होते. जवळपास पाऊण तास हे वादन सुरू होते. त्यानंतर प्रत्येक मंडळात जवळपास अर्ध्या तासाचे अंतर पडत गेले.
रात्री बारापर्यंत ग्राहक पेठ, शिवदर्शन मित्रमंडळ, श्रीचिमण्या गणपती मंडळ, टिळक रोड गणेशोत्सव मंडळ यांसह केवळ २१ मंडळे स.प. महाविद्यालयासमोरून पुढे गेली होती. तर केवळ १५ मंडळांची मिरवणूक टिळक रस्ता पार करून विसर्जनासाठी मार्गस्थ झाली होती. पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीवरून टिळक रस्त्यावरील मिरवणुकीत १९६ मंडळांनी सहभागी घेतला.
याचा अर्थ रात्री बारा वाजेपर्यंतची १५ मंडळे सोडल्यास तब्बल १८१ मंडळांची मिरवणूक केवळ १३ ते १४ तास चालली. दिवसभर पोलिसांकडून मंडळांना मिरवणुकीत पुढे सरकण्यासाठी कोणतीही सक्ती केली जात नव्हती. त्यामुळे ढोल-ताशा पथकांसह डीजे असलेली मंडळे हवा तेवढा वेळ एका जागेवर थांबून राहात होती.
रात्री बारानंतर डीजे बंद झाल्यानंतर सकाळी सहा वाजेपर्यंत केवळ १८ मंडळे शांतपणे स. प. महाविद्यालयासमोरून पुढे गेली. सहा वाजल्यानंतर एकाच वेळी बहुतेक सर्वच मंडळाचे डीजे सुरू झाला. त्यानंतर मात्र एकामागोमाग एक मंडळ पुढे सरकू लागले. शुक्रवारी दुपारी १.१० वाजता अंकुश मित्र मंडळ महाविद्यालयासमोरून गेले.