पवना धरण आटले आता, पड पड रे पावसा...
By Admin | Published: June 19, 2016 04:41 AM2016-06-19T04:41:14+5:302016-06-19T04:41:14+5:30
पवना धरणाने तळ गाठला असून, १३% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ४० वर्षांच्या इतिहासात जून महिन्यात पहिल्यांदाच इतका कमी पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस
पवनानगर : पवना धरणाने तळ गाठला असून, १३% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ४० वर्षांच्या इतिहासात जून महिन्यात पहिल्यांदाच इतका कमी पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस लांबल्याने चिंता आणखी वाढली आहे.
मागील वर्षी २०१५मध्ये पाऊस कमी झाल्याने पवना धरण अवघे ८० टक्के इतके भरले होते. या वर्षी अर्धा जून संपला, तरीदेखील पाऊस सुरू न झाल्याने धरणाची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. धरण हे नदीसारखे दिसू लागले आहे. आजअखेर धरण पाणलोट क्षेत्रात फक्त २३ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. उपयुक्त साठा ३३ घनमीटर आहे. यामुळे पाण्याची समस्या आता तीव्र होण्याची भीती आहे. धरणातून दररोज १२०० क्युसेसने ६ तास पाणी विसर्ग होत आहे. यात आता सोमवारपासून बदल करण्यात येणार असून, ४०० क्युसेसने पाणी विसर्ग केला जाणार आहे. यामुळे आता पाणीकपातीसोबत पाणी जपून वापरावे लागणार आहे. आकाशात ढग दिसत असले, तरी पाऊस मात्र नसल्याने पावसाची अजून किती काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे, हा चिंतेचा विषय आहे. मागील पाच वर्षांचा विचार केला असता १८ जून अखेर पडलेला पाऊस याचा विचार करता सर्वात कमी पाणीसाठा या वर्षी आहे.
तर सर्वांत कमी पाऊस २००१ साली झाला होता. तो फक्त १६३१ मिलिमीटर इतका होता. तर सर्वांत जास्त पाऊस २००५ साली झाला होता. तो ६५६८ इतका झाला होता.
२०११ साली २ जून रोजी सर्वांत लवकर पाऊस सुरू झाला होता. त्या वर्षी जून महिन्यात ७७३ इतक्या पावसाची नोंद झाली होती. त्या वेळी पावसाची प्रतीक्षा करावी लागली नाही.
गाळ काढण्याचे नियोजन न झाल्याने वाळूमाफीयाप्रमाणे माजी माफीया तयार होऊन वाद वाढत गेल्याने गाळ उपसा शासनाने थांबवला आहे. पुढील वर्षी महापालिकेने खर्च करून हा गाळ फक्त शेतकऱ्यांच्या शेतासाठीच द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या वर्षी मातीमधून वीटभट्टी व्यवसायाचा मोठा फायदा झाला. व काहींनी यातून लाखोंची कमाई केली. पाण्याची इतकी गरज असताना पवना धरणाचे मजबुतीकरण मात्र गेल्या १६ वर्षांपासून रखडले आहे. यावर २४ कोटींपैकी १० कोटी खर्च झाला आहे. मात्र, १० कोटींचा निधी मजबुतीकरण धरणग्रस्तांनी थांबविल्याने पडून आहे.
धरणात १० टीएमसी पाणी साठवण क्षमता असतानादेखील धरणाच्या किरकोळ डागडुजीवर या वर्षी १ रुपयादेखील खर्च झालेला नाही. धरणाचे काम पूर्ण होऊन ४० वर्षे झाली आहेत. यामुळे धरणाची किरकोळ डागडुजी करणे गरजेचे आहे. मात्र, याकडे पूर्ण दुर्लक्ष असून, धरणाच्या किरकोळ कामासाठी किमान ३० लाखांपर्यंतचा खर्च करून योग्य ती डागडुजी होणे गरजेचे आहे, असे शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी सांगितले.