फुटपाथ भाड्याने, परवानाधारकांचा धंदा : पाच ते सहा हजार भाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 03:47 AM2018-04-19T03:47:10+5:302018-04-19T03:47:10+5:30
महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरामध्ये तब्बल २८ हजार २४९ पथारी व्यावसायिक असून, यापैकी सुमारे १६ हजार १७४ पथारी व्यावसायिक नोंदणीकृत आहेत.
सुषमा नेहरकर-शिंदे ।
पुणे : महापालिकेच्या मालकीचे फुटपाथ चक्क भाड्याने देण्याचे प्रकार शहरात सुरू आहेत. सिंहगड रस्ता, लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रस्त्यासह शहरातील अन्य लहान-मोठ्या व्यवसाय करणाऱ्या परवानाधारकांकडून फुटपाथची आपली जागा दरमहा ५ ते ६ हजार रुपये भाडे घेऊन अन्य विक्रेत्यांना देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरामध्ये तब्बल २८ हजार २४९ पथारी व्यावसायिक असून, यापैकी सुमारे १६ हजार १७४ पथारी व्यावसायिक नोंदणीकृत आहेत. पहिल्या टप्प्यात ७ हजार पथारी व्यावसायिकांच्या पुनर्वसनाचे काम महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे.
दुसºया टप्प्यात शिल्लक ९ हजार पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. सध्या शहराच्या अनेक रस्त्यांवर, फुटपाथवर चौका-चौकात अनधिकृत पथारी व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. यामध्ये अनेकांनी महापालिकेचा परवानादेखील घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेला कोणतेही भाडे अथवा कर न भरता पथारीधारक लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादावर राजरोस धंदा सुरू ठेवतात.
महापालिका प्रत्येक परिसर, तेथे असलेला व्यवसाय, जागेची मागणी या सर्व गोष्टींचा विचार करून भाड्याचे दर निश्चित केले जातात. यासाठी पथारी व्यावसायिकांची अ, ब, क, ड असे वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे या पथारी व्यावसायिकांना २५ रुपयांपासून ते ३०० रुपये प्रतिदिन असे भाडे आकारले जाते. परंतु शहरातील अनेक रस्त्यांवर फुटपाथच्या जागा काही परवानाधारक पथारी व्यावसायिकांकडून चक्क भाड्याने दुसºया व्यक्तीला दिली जात आहे. यासाठी पाच ते सहा हजार रुपयांपर्यंत भाडे घेतले जात आहे.
मूळ मालकानेच व्यवसाय केला पाहिजे
आपल्या कुटुंबाचे चरितार्थ चालावा, यासाठी महापालिकेकडून गरजू व्यक्तींना लहान-मोठा व्यावसाय करण्यासाठी प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे मूळ मालकानेच धंदा करणे आवश्यक आहे. ज्याला गरज नाही त्याला केवळ भाडे घेण्यासाठी परवाना दिला जात नाही. यामुळे संघटनेच्या वतीने अशा व्यावसायिकांना कधीही पाठीशी घातले जात नाही. असे काही प्रकार संघटनेच्या लक्षात आल्यास महापालिकेला संबंधित व्यावसायिकाचा परवाना रद्द करण्यास सांगण्यात येईल.
- बाळासाहेब मोरे,
सरचिटणीस, पथारी व्यावसायिक पंचायत