ज्येष्ठ कलावंतांच्या पेन्शनचा मार्ग मोकळा; पुणे जिल्ह्यात ८ जणांची कमिटी स्थापन
By श्रीकिशन काळे | Published: October 8, 2024 04:48 PM2024-10-08T16:48:53+5:302024-10-08T16:49:12+5:30
साहित्यिक, कलावंत हे आयुष्यभर समाजासाठी आपले आयुष्य खर्ची घालत असतात, उतारवयात त्यांना कामे मिळणे अवघड होते
पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील वृध्द साहित्यिक व कलावंतांचे मानधन रखडलेले होते. कारण त्यासाठी जिल्ह्याची कमिटीच अस्तित्वात नव्हती. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर पुणे जिल्ह्याची ८ जणांची कमिटी नियुक्ती केली आहे. त्यामुळे कलावंतांना मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
साहित्यिक, कलावंत हे आयुष्यभर समाजासाठी आपले आयुष्य खर्ची घालत असतात. उमेदवारीच्या काळात ते काम करतात आणि उतारवयात मात्र त्यांच्यासाठी भक्कम आधार मिळणे कठिण होते. कारण अनेक कलावंतांना कामे मिळणे अवघड होते. त्यामुळे त्यांना जगण्यासाठी राज्य सरकारकडून मानधन योजना सुरू केली आहे. पण गेल्या काही वर्षांपासून मानधन अर्ज मंजूर करणारी कमिटीच अस्तित्वात नव्हती. त्यामुळे अडीच ते तीन हजार अर्ज प्रलंबित पडले होते. त्यासाठी अनेकदा प्रशासनाला निवेदने दिली, पाठपुरावा केला. अखेर सरकारने जिल्ह्याची कमिटी गठित केली आहे. त्यामध्ये सुरेश धोंडिबा धोत्रे (अध्यक्ष), सर्व गटविकास अधिकारी (सदस्य), जिल्हा समाजकल्याण अधिकारी (सदस्य), प्रदीप कुलकर्णी (सदस्य), कौस्तुभ कुलकर्णी, डॉ. शाम दलाल, मोहित कैलास सावंत आणि सदस्य सचिव म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.
साधारणतः सोळा-सतरा महिने झाले ही कमिटी स्थापन नसल्यामुळे पुणे जिल्हा अधिकाऱ्याकडे कमीत- कमी पुणे जिल्ह्यातील दोन -अडीच हजार फॉर्म कलावंतांचे प्रलंबित होते, त्यात कमिटी नसल्यामुळे कलावंतांना पेन्शन पासून वंचित राहावं लागत होतं, आम्ही राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा यांचा पाठपुरावा करून कमिटी स्थापन करून घेतली आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली.
नवनियुक्त कमिटीच्या सदस्यांकडून प्रलंबित असलेल्या वृद्ध कलावंतांच्या पेन्शनच्या फॉर्मची छाननी करून ते लवकरात लवकर मान्य करून ती पेन्शन कशी लवकर लागू होईल, यासाठी या कमिटीकडून आम्ही प्रयत्न करून घेऊ.- बाबासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग