पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नतीचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 02:28 PM2023-04-03T14:28:52+5:302023-04-03T14:29:03+5:30
जवळपास ४५० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याच्या प्रस्तावाला आयुक्तांनी मंजुरी दिली
पुणे : महापालिकेच्या शिक्षण विभागातील जवळपास ४५० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याच्या प्रस्तावाला आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या महापालिकेतील कुठल्याही विभागात होतील. शिवाय त्यांना पदोन्नतीदेखील मिळणार आहे. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरच प्रारूप सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
पुणे महानगरपालिका सेवा प्रवेश नियमावली २०१४ नुसार प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळणार आहे. आजमितीस माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाकडील शिक्षकेतर सेवकांच्या बदल्या व बढत्या या पुणे पालिका आस्थापनेवर करण्यात येत नाही. तसेच त्या शिक्षकेतर सेवकांची सेवाज्येष्ठता ही स्वतंत्र ठेवण्यात आलेली आहे. पुणे मनपाकडील अन्य विभाग जसे मुख्यलेखापरीक्षण विभाग, नगरसचिव कार्यालय, मुद्रणालय विभाग या कार्यालयाकडील सर्व संवर्गाच्या सेवकांच्या सेवाज्येष्ठता याद्या व रोस्टर स्वतंत्र ठेवण्यात आलेले आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या (तत्कालीन शिक्षण मंडळाकडील) सेवकांच्या सेवाज्येष्ठता याद्या एकत्रित केल्यास पुणे महापालिकेच्या मूळ संवर्गातील सेवकांच्या सेवाज्येष्ठतेवर परिणाम होऊन त्यास मूळ संवर्गातील सेवकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे.
शिक्षकेतर सेवकांच्या सेवाज्येष्ठता
पुणे महापालिका आस्थापनेत ही पदे विलीन करावयाचे असल्यास पालिका आस्थापनेवरील मंजूर पदसंख्येत बदल करावे लागतील. पालिका आस्थापनेवरील मंजूर पदांवर प्राथमिक शिक्षण विभागातील शिपाई, रखवालदार पदावरील रोजंदारी कर्मचारी सामावून घेण्याची मागणीही पुढे येण्याची शक्यता होती. या सर्व बाबी विचारात घेऊनच सामान्य प्रशासन विभागाने समायोजनेचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांना दिला होता. त्यास आयुक्तांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडील स्वीय सहा. लघुलेखक (वर्ग-३), कनिष्ठ अभियंता (वर्ग-३), प्रशासन अधिकारी (वर्ग-२), अधीक्षक (वर्ग-३), उपअधीक्षक (वर्ग-३), वरिष्ठ लिपिक (वर्ग-३), लिपिक टंकलेखक (वर्ग- ३), शिपाई (वर्ग-४), रखवालदार (वर्ग-४), बिगारी (वर्ग-४) व माळी (वर्ग-४) या पदांचा समावेश आहे.